Railway insurance : रेल्वे तिकिटासोबत विमा कवच हवे असल्यास पूर्ण पेमेंट ऑनलाइनच करावे लागणार
रेल्वेच्या रिझर्व्हेशन काउंटरवरून प्रवास तिकीट काढताना प्रवास विमा घेणाऱ्या प्रवाशांना आता संपूर्ण तिकिटाची रक्कम डिजिटल पद्धतीनेच भरावी लागणार आहे.

Railway insurance – रेल्वेच्या रिझर्व्हेशन काउंटरवरून प्रवास तिकीट काढताना प्रवास विमा घेणाऱ्या प्रवाशांना आता संपूर्ण तिकिटाची रक्कम डिजिटल पद्धतीनेच भरावी लागणार आहे.
विम्याचा हप्ता (प्रिमियम) अवघा ४५ पैसे असल्याने आणि ५, १०, २० व २५ पैशांची नाणी व्यवहारात नसल्याने, रोख रकमेत हा हप्ता स्वीकारला जाणार नाही. हा नवीन नियम २७ ऑक्टोबरपासून लागू होत आहे.
रेल्वे बोर्डाकडून सर्व झोनल रेल्वेला पाठवण्यात आलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, जर प्रवाशाने विम्याचा पर्याय निवडला असेल, तर तिकीट भाडे आणि विम्याचा प्रिमियम यांची एकत्रित रक्कम केवळ डिजिटल माध्यमातूनच स्वीकारावी. काउंटर कर्मचाऱ्यांनी याची खात्री करावी.
आयआरसीटीसीवरून ऑनलाइन ई-तिकीट काढताना प्रवाशांना हा विम्याचा पर्याय आधीपासून उपलब्ध होता. ६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रेल्वे बोर्डाने ही सुविधा आता थेट काउंटरवरून तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांसाठीही उपलब्ध करून दिली आहे.
सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काउंटर सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक बदल करण्यात आले असून चाचणी पूर्ण झाली आहे. तिकीट रद्द केल्यास ४५ पैशांच्या प्रिमियममधून ९ पैसे वजा करून उर्वरित रक्कम इतर तिकीट रद्द करण्याच्या शुल्कासह परत केली जाईल.
विमा योजनेच्या अटी व शर्तींनुसार ४५ पैशांच्या विम्यात मृत्यू किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास १० लाख रुपये, आंशिक अपंगत्व आल्यास ७.५ लाख रुपये, उपचाराचा खर्च २ लाख रुपयांपर्यंत संरक्षण मिळते.





