FSSAI Action Newspapers : वृत्तपत्रात समोसा, वडापाव दिल्यास होणार जेल; ‘FSSAI’चा मोठा इशारा
अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य व्यवसायिकांवर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. गंभीर प्रकरणांमध्ये परवाना रद्द करणे, दंड किंवा कायदेशीर कारवाईचाही सामना करावा लागू शकतो.

FSSAI Action Newspapers : रस्त्यावरील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना अनेकजण वर्तमानपत्रात गुंडाळलेला वडापाव, समोसा, भजी, ब्रेड पकोडा किंवा चाट खाताना दिसतात. मात्र ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असा गंभीर इशारा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) ने दिला आहे.
FSSAI ने अलीकडेच रेस्टॉरंट्स, स्ट्रीट फूड विक्रेते, केटरर्स आणि खाद्य व्यवसायिकांना वर्तमानपत्राचा वापर अन्न पॅकिंग, सर्व्हिंग किंवा साठवणुकीसाठी तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. (FSSAI Action Newspapers)
मुंबईतील एका प्रसिद्ध वडापाव विक्रेत्याकडे वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ दिले जात असल्याचे आढळल्यानंतर FSSAI आणि मुंबई महानगरपालिकेने संयुक्त कारवाई केली होती. त्यानंतर हा इशारा पुन्हा जारी करण्यात आला. (FSSAI Action Newspapers)
FSSAI च्या मते, वृत्तपत्र छपाईसाठी वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये विविध रसायने, रंगद्रव्ये, बाइंडर्स तसेच शिसे (Lead) आणि इतर जड धातू असू शकतात. गरम किंवा तेलकट पदार्थ वर्तमानपत्रावर ठेवले असता ही रसायने अन्नामध्ये मिसळण्याचा धोका असतो. अशा अन्नाचे सेवन केल्यास दीर्घकालीन आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
वर्तमानपत्रे छपाईनंतर वाहतूक, वितरण आणि हाताळणीदरम्यान अनेक ठिकाणी जातात. त्यामुळे त्यावर बॅक्टेरिया, विषाणू किंवा इतर रोगकारक सूक्ष्मजीव असण्याची शक्यता असते. हे जंतू अन्नामध्ये जाऊन फूड पॉइझनिंग किंवा इतर संसर्गजन्य आजारांना कारणीभूत ठरू शकतात.
नियम आधीपासूनच लागू :
FSSAI ने स्पष्ट केले आहे की, वर्तमानपत्रात अन्न गुंडाळणे किंवा सर्व्ह करणे हा नवीन नियम नाही. Food Safety and Standards (Packaging) Regulations, 2018 अंतर्गत वर्तमानपत्र किंवा तत्सम मुद्रित कागदाचा अन्नाशी थेट संपर्कासाठी वापर करण्यास बंदी आहे. यामध्ये अन्न गुंडाळणे, झाकणे, सर्व्ह करणे किंवा तळलेल्या पदार्थांवरील अतिरिक्त तेल शोषण्यासाठी वर्तमानपत्र वापरणे यांचा समावेश आहे.
नियम मोडल्यास कारवाई :
अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य व्यवसायिकांवर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. गंभीर प्रकरणांमध्ये परवाना रद्द करणे, दंड किंवा कायदेशीर कारवाईचाही सामना करावा लागू शकतो. FSSAI राज्य सरकारांच्या अन्न सुरक्षा विभागांसह या नियमांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवत आहे.





