निवडणूक आयोगावर विश्वास नसेल तर राजीनामा द्या.! राहुल आणि गांधी परिवाराला भाजपचे आव्हान

नवी दिल्ली – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कथित मतचोरी विरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. त्यावरून भाजपने शनिवारी त्यांना आव्हान दिले. निवडणूक आयोगावर विश्वास नसेल; तर राहुल यांनी नैतिक आधारावर खासदारकीचा राजीनामा द्यावा. कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, त्या पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही तशीच कृती करावी, अशी उपरोधिक मागणी त्या पक्षाने केली.
निवडणुकांमधील अनियमिततांचे पुरावे उपलब्ध आहेत, असे म्हणत राहुल यांनी नुकतेच स्फोटक दावे केले. त्यांनी दाव्यांच्या पुष्टीसाठी पत्रकार परिषदेत ऑनलाइन सादरीकरणही केले. निवडणुकांमध्ये प्रचंड प्रमाणात गुन्हेगारी स्वरूपाची फसवणूक सुरू आहे. भाजप आणि निवडणूक आयोगातील संगनमतातून ती घडत आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. त्यावरून भाजप आणि आयोगाने याआधीच जोरदार पलटवार केले.
त्यानंतर शनिवारी भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पुन्हा राहुल यांच्यासह गांधी परिवारावर टीकेची झोड उठवली. राहुल यांनी प्रसार माध्यमांसमोर निराधार आरोप केले. मात्र, त्यांनी पुरावे देण्यास किंवा लेखी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयानेही याआधीच निवडणूक आयोगाच्या प्रामाणिकपणावर शिक्कामोर्तब केले आहे.
कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत कॉंग्रेसची सत्ता आहे. त्या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा निवडणूक आयोगावर विश्वास नसल्याने संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही राजीनामे द्यावेत, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. राहुल यांना राज्यघटना, लोकशाही उद्धवस्त करायची आहे. त्यांनी घटनात्मक संस्थांविरोधात युद्ध सुरू केले आहे, असा आरोपही भाटिया यांनी केला.





