“१५-२० वर्ष राहूनही त्या राज्याची भाषा येत नसेल, तर लाज वाटली पाहिजे,” श्रुती मराठेने व्यक्त केला संताप

Shruti Marathe | महाराष्ट्रात सुरु असलेल्या मराठी आणि हिंदी भाषा वादावर राजकीय नेत्यांपासून कलाकाराही प्रतिक्रिया देत आहेत. अशातच आता मराठी अभिनेत्री श्रुती मराठेनं यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखती दरम्यान श्रुतीने १५-२० वर्ष महाराष्ट्रात राहूनही मराठी येत नसेल तर त्याचा अभिमान नाही तर लाज वाटली पाहिजे, असे म्हणत तिने मराठी न येणाऱ्यांवर टीका केली आहे.
एका मुलाखतीदरम्यान श्रुती मराठे म्हणाली की, ‘मला असं वाटतं की, जे लोक महाराष्ट्रात आज आलेत त्यांच्याकडून तुम्ही मराठी बोलाच ही अपेक्षा करणं खूप चुकीचं आहे. कारण, मी सुद्धा जेव्हा हैदराबाद किंवा चेन्नईला जाते तेव्हा त्यांची अपेक्षा नसते की मी येऊन तमिळ किंवा तेलुगु बोलावं. त्यांचं फक्त एवढंच असतं की तुम्ही प्रयत्न करताय का आमची भाषा बोलण्याचा. मला चित्रपटात काम करायचंय तर माझ्याकडे तो ऑप्शनच नाही.”
महाराष्ट्रात मला इतके लोक माहीत आहेत की जे मराठी नाहीत. ते गर्वाने सांगतात की, आम्ही २०-२५ वर्ष मराठीत राहतो पण हमको नही आती मराठी, याचा राग आहे. या गोष्टीचा तुम्हाला कसला अभिमान?’, असा सवाल श्रुतीने केला आहे.
….लाज वाटली पाहिजे
‘तुम्ही २०-२५ वर्ष महाराष्ट्रात राहताय तुमच्या आजुबाजूला इतके मराठी लोक आहेत. कदाचित तुमच्याकडे काम करणारी सगळी मंडळीही मराठी असतील. पण, तरी तुम्ही इतक्या वर्षात मराठी नाही शिकलात? मला याचा प्रॉब्लेम आहे. हे मला कुठेतरी खटकतं. ज्या पद्धतीने आता मराठी भाषेचा जोर केला जातोय, ती पद्धत कदाचित चुकीची असेल. पण, यामागचा जो मेसेज आहे तो बरोबर आहे. तुम्ही एखाद्या राज्यात राहता आणि १५-२० वर्ष त्या राज्यात राहूनही तुम्हाला त्या राज्याची भाषा येत नाही. याची लाज वाटली पाहिजे.’
‘आम्ही अपेक्षा करतच नाही की, बाबा तू काल आलास आणि उद्यापासून मराठी बोलायला लाग. मी तर ५ वर्ष अपेक्षा करणार नाही. कारण तुला कदाचित ५ वर्ष मराठी भाषा शिकायला. पण तुम्ही प्रयत्न किती करताय? तुम्ही अस्खलित मराठी बोला अशी आमची अपेक्षा नाही. पण, अपेक्षा फक्त एवढीच आहे की तुम्ही प्रयत्न तर करा. ज्या पद्धतीने गुंडगिरी चालू त्याचा राग येतो आणि ज्या गर्वाने सांगतात की मराठी शिकणार नाही त्याचाही राग येतो, ‘ असं म्हणत श्रुतीनं संताप व्यक्त केला आहे. Shruti Marathe |
दरम्यान, मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठेने मालिकांसह चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. याशिवाय अलीकडेच तिने साऊथ सिनेमात देखील काम केले आहे. ‘देवरा’ या साऊथ सिनेमात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. Shruti Marathe |
हेही वाचा :





