“वेळ पडल्यास पुन्हा ओबीसी बैठक घेऊ…”; कुणबी सर्टिफिकेट बद्दल बावनकुळे नेमकं काय म्हणाले? पाहा…
Chandrashekhar Bawankule – हैद्राबाद गॅझेटमध्ये खरे कुणबी असलेल्यांना जात प्रमाणपत्र जीआरमुळे मिळाले आहे, वडेट्टीवार यांची मागणी तीच होती, आता वडेट्टीवार यांनी दाखवावे की प्रशासनाने खोटे प्रमाणपत्र दिले, तसे असल्यास कारवाई करू, किंबहुना पुन्हा चर्चा करू. पण त्यांनी संभ्रम निर्माण करू नये, दोन समाजाला एकमेकांच्या पुढे आणू नये. वेळ पडल्यास पुन्हा ओबीसी नेत्यांची बैठक बोलवू. त्या जीआरचा इतर भागाशी संबंध नाही, खऱ्या कुणबींना सर्टिफिकेट द्यायचे नाही हे योग्य नसल्याची, प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह ४० ते ४५ ओबीसी नेत्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. यावेळी जीआरमधील मुद्द्यावर चर्चा झाली. वडेट्टीवार मराठवाड्यात जाऊन बोलले होते, मग आज विरोध का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी १ नोव्हेंबरला ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकी संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे नागपूर येथे बोलत होते.
दरम्यान, बच्चू कडू, महादेव जानकर, अजित नवले आणि राजू शेट्टी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या चौघांना विनंती केली आहे की, २८ तारखेला मुख्यमंत्री बैठक घेत असल्याने आंदोलनाचा विचार पुढे ढकलावा, शासनाची बैठक असल्याने बैठकीनंतर पुढील दिशा ठरवावी. बैठकीत यावे, शासनासोबतच्या बैठकीतून जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळतो, या बैठकीत सर्वच विषयावर चर्चा होईल, तोडगा निघणार असा विश्वास आहे, असेही बावनकुळे यावेळी म्हणाले.





