ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल, तर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी; हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, राज्यातील शेतकऱ्यांनी कर्ज भरावे असे विधान केले होते. अजित पवार यांच्या या विधानावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून महायुती सरकारला धारेवर धरले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांची पेरणीपूर्ण कर्जमाफी करण्याचे आव्हान केले आहे. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, असे जाहीर आश्वासन देणाऱ्या महायुतीच्या नेत्यांची भाषा बदलली असून ३१ मार्चपूर्वी कर्ज भरण्याचे फर्मान काढले जात आहे. पण पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर त्यांनी केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज आणावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
वक्फ सुधारणा विधेयकवर बोलताना सपकाळ म्हणाले की, संविधान सभेत नियम तयार होत असतानाच जमिनीचे काही विशेष अधिकार दिलेले आहेत. मंदिर, प्रार्थना स्थळे यांना जमिनी दिल्या आहेत, इनाम जमिनी देण्यात आल्या आहेत, महाराष्ट्रात छत्रपतींच्या वारसांनाही जमिनीचे विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. भाजपा सरकार वक्फ विधेयकाकडे धार्मिक नजरेने पाहून ती जमीन उद्योगपती व बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहे का, असा आरोप सपकाळ यांनी केला.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यात नटसम्राट शिरला होता
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशन कोणताही महत्त्वाचा निर्णय न घेताच गुंडाळला. मोठी-मोठी भाषणे केली पण त्यांना त्यांच्याच जाहीरनाम्याचा विसर पडला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यात नटसम्राट शिरला होता पण ‘राजा उदार झाला आणि हाती भोपाळा दिला’, असे वर्णन अधिवेशनाचे करावे लागेल.
जनतेचे मुलभूत प्रश्न सोडून औरंगजेबाची कबर उकरून काढण्यात आली. बेरोजगारी, शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला भाव याचा विसर महायुती सरकारला पडला आहे. सरकारने जाणीवपूर्वक मुद्द्यांना बगल दिली, असा आरोप देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केला.





