ओलिसांना न सोडल्यास पुन्हा युद्ध सुरू; इस्रायच्या पंतप्रधानांचा हमासला इशारा

जेरुसलेम : जर शनिवारी जास्त ओलिसांची सुटका केली नाही, तर युद्धबंदी करारातून माघार घेतली जाईल आणि पुन्हा युद्धाला सुरुवात केली जाईल, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी हमासला दिला आहे. इस्रायलकडून युद्धबंदीचे पालन केले जात नसल्याचा आरोप करून हमासने ३ ओलिसांची सुटका करण्यास विलंब केला आहे.
गाझामध्ये ठरलेल्या संख्येइतके तंबू उभारायला आणि अन्य मदत उपलब्ध करून द्यायला इस्रायलने अनुमती नाकारली असल्याचा आरोप हमासकडून केला जातो आहे. युद्धबंदी सुरू झाल्यापासून हमासने पाच टप्प्यांमध्ये २१ ओलिसांची सुटका केली आहे. त्याबदल्यात इस्रायलने ७३० पॅलेस्टिनी कैद्यांची तुरुंगातून सुटका केली आहे.
युद्धबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात उर्वरित सर्व ओलिसांची सुटका केली जाणे अपेक्षित आहे. तसेच युद्धबंदीला बेमुदत काळापर्यंत मुदतवाढ मिळणे अपेक्षित आहे.गाझामधील पॅलेस्टिनींच्या स्थलांतराविषयी ट्रम्प यांनी केलेल्या टिप्पणीमुळे नव्याने अस्थिरता निर्माण झाली आहे.
नेतान्याहू यांची धमकी शनिवारी सुटका होणाऱ्या तीन ओलिसांच्या सुटकेपुरती मर्यादित आहे की उर्वरित सर्व ओलिसांच्या सुटकेसाठी, हे लगेच स्पष्ट होऊ शकले नाही. जर हमासने मुदत पाळली नाही,तर पुन्हा युद्धाला सुरुवात करण्यासाठी नेतान्याहू यांनी सैन्याला सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीला हमासनेही प्रत्युत्तर दिले आहे. युद्धबंदीचा करार दोन्ही बाजूंनी मान्य केला आहे. युद्ध थांबवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. धमकीची भाषा येथे उपयोगाची नाही. यामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनते, असे हमासचा प्रवक्ता सामू अबू झुहरी याने म्हटले आहे.
ट्रम्प यांचीही धमकी
हमासने ओलिसांच्या सुटकेसाठी विलंब होणार असे जाहीर केल्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही शनिवारपर्यंत सर्व ओलिसांची सुटका न झाल्यास गाझामध्ये नरक निर्माण करण्याची धमकी दिली आहे. इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या महिन्यापासून सुरू झालेल्या युद्धबंदीच्या टिकाऊपणाबद्दल ट्रम्प यांनी पहिल्यापासूनच शंका उपस्थित केली आहे.
व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प यांनी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली. हमासकडून सर्व उर्वरित ओलिसांची सुटका होणार नाही, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. जर हमासने शनिवारपर्यंतची मुदत पाळली नाही, तर हमासला कठोर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.





