‘देश सांभाळता येत नसेल तर…’; जम्मू-कश्मीरमधील हल्ल्यावरून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला घेरलं

Jammu and Kashmir । Uddhav Thakeray । Narendra Modi – जम्मू आणि काश्मीरच्या डोडामध्ये मंगळवारी रात्री चत्तरगला भागातील सुरक्षा चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर तेथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सुरू असलेली चकमक आज सलग दुसऱ्यादिवशीही सुरूच होती.
डोडा येथील भदरवाह-पठाणकोट मार्गावरील चत्तरगला भागात लष्कराच्या तळावर आणि पोलीस तसेच राष्ट्रीय रायफल्सच्या संयुक्त चौकीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर जखमी झाले आहेत.
कठुआ जिल्ह्यातील हिरानगर गावात मंगळवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे घडले आहे ज्यात एक दहशतवादी मारला गेला. त्या आधी रविवारी रियासी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहा यात्रेकरू ठार झाले.
गेल्या 48 तासांत काश्मीरमध्ये दहशतावाद्यांनी डोके वर काढले आहे. तीन ठिकाणी हल्ले झाले आहेत. तर चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. या भागातील परिस्थिती पाहता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आणि हीच परिस्थितीबाबत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर चौफेर टीका केली आहे. आज उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
जम्मू-काश्मीरमध्ये तीन दिवसांत तीन दहशतवादी हल्ले झाले. ही जबाबदारी कोणाची आहे, असा सवाल करत त्यांनी ‘अब की बार’वाले कुठे गेले असा टोला भाजपला हाणला. देशात सातत्याने दहशतवादी हल्ले होते आहे. मणिपूर इतक्या दिवसांपासून धुमसत आहे, पण सत्ताधाऱ्यांपैकी कोणीच तिकडे जात नसल्याचे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत भाजपने जम्मू-काश्मीरचा मुद्दा प्रचारात आणला होता. 370 कलम हटविल्याचे प्रचार सभेत सांगण्यात येत होते. कलम 370 हटविल्याचा या लोकांनी ढोल बडवला. मात्र तिथलं सत्य काय हे आम्ही जनतेसमोर आणलं. त्यावर हे लोक आता काहीच बोलणार नाही. हे कलम हटवून काय फरक पडला? असा सवाल त्यांनी केला.
तिकडे लोकांचे जीव जात असताने हे लोक तिसऱ्यांदा सरकार आणल्याची जाहिरात करण्यात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. आता पंतप्रधान, गृहमंत्री जम्मू-काश्मीरला जाणार का? असा सवाल त्यांनी केला. मोदींना देश सांभाळता येत नसेल तर त्यांना पंतप्रधान पदावर बसण्याचा अधिकार नाही, अशी टीका देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.





