बोपदेव घाटातील चेकपोस्ट सुरू असता तर…

संजय कडू
पुणे – कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोपदेव घाटात लुटमारीच्या आणि जबरी चोरीच्या घटना वाढल्यानंतर तत्कालिन आयुक्त आणि पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये चेकपोस्ट उभारले होते. तेथे दिवसा दोन आणि रात्री दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. यामुळे अशा घटनांना बऱ्यापैकी आळा बसला होता.
आता, मात्र हे चेकपोस्टच बंद करण्यात आले असून फक्त पेट्रोलींग सुरू ठेवण्यात आले आहे. यामुळे घाट परिसरात पुन्हा गुन्हेगारी माजली आहे. गुरुवारी घडलेली सामुहिक बलात्काराची घटना चेकपोस्ट पासून हाकेच्या अंतरावरच घडली आहे.
बोपदेव घाटात वस्ती नाही तसेच रात्रीच्या वेळी वर्दळही कमी असते. घाटातील काही ठिकाणी तरुण-तरुणी एकांतात फिरण्यासाठी मोठ्या संख्यने येतात. येथे चेकपोस्ट जवळील जागा जोडप्यांसाठी खास पसंतीची आहे. एक प्रकारे तेथे लव्हर पॉईंटच झाला आहे. हा परिसर ग्रामीण पोलसांच्या हद्दीत असताना सामुहिक बलात्कार आणि खूनाची घटना घडली होती.
कोंढवा पोलिसांच्या हद्दीत हा परिसर आल्यावर २२ सप्टेंबर २०२३ रोजी तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. अगदी तीन दिवसांपूर्वीच मित्राबरोबर फिरायला आलेल्या एका तरुणीचे अपहरण करुन तीला गाडीत बसवून विनयभंग करण्यात आला होता. या घटनेनंतरही कोंढवा पोलिसांना जाग आली नाही. पोलिसांनी गस्त वाढवली असती तसेच चेकपोस्ट सुरु केला असता तर हा सामुहिक बलात्काराची घटना टळली असती.
बोपदेव घाटामध्ये बंद चेकपोस्टपर्यंत सहा ठिकाणी स्कॅनर लावण्यात आले आहेत. गस्तीवरील पोलीस कर्मचारी दिवसा व रात्री गस्त घालताना स्कॅन करून हजेरी लावतात. मात्र, त्या पलिकडे ते कोणत्याही प्रकारचे पोलिशिंग करीत नाहीत. आपली उपस्थिती ते फक्त ऑनलाइन नोंदवतात, अशा तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत. चेकपोस्ट बंद असल्याने गुन्हेगारांना पोलिसांची धास्ती राहिलेली नाही. तेथील वाढलेली लोकवस्ती आणि घाटातली वर्दळ लक्षात घेता चेकपोस्ट सुरू ठेवून किमान रात्रीच्या वेळी चार कर्मचारी नेमण्याची मागणी होत आहे.
लव्हर पॉईंट…
बोपदेव घाटातील पोलीस चेकपोस्टच्या डोंगरावर सुर्योदय पाहण्यासाठी पहाटे चार पासून जोडप्यांची गर्दी असते. हा एक प्रकारे लव्हर पॉईंट झाला असून येथे पोलिसांची गस्त वाढवणे, विजेची सोय, सुरक्षे संदर्भात फलक आदी सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहेत. कारणकी येथे मोबाइलची रेंजही येत नाही.
“बोपदेव घाटातील चेक पोस्ट चोवीस तास सुरू नाही. तेथे फक्त पेट्रोलिंग केले जात आहे. मागील पाच ते सहा महिन्यात येथे जबरी चोरी झाल्याचा प्रकार घडला नसल्याची माहिती आहे.” – रंजन शर्मा, सह पोलीस आयुक्त.





