“छत्तीसगडमध्ये पुन्हा सत्ता आल्यास..” राहुल गांधींची मोठी घोषणा

नवी दिल्ली – छत्तीसगडमध्ये पुन्हा कॉंग्रेसचे (Congress) सरकार सत्तेवर आल्यास राज्यातील गरीब जनतेला आरोग्य सहाय्य योजनेंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा देण्याचे आश्वासन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले आहे. राजनांदगाव जिल्हा मुख्यालयात निवडणूक रॅलीला संबोधित करताना, गांधींनी असेही आश्वासन दिले की भूमिहीन शेत मजुरांना (ShetMajur) सध्याच्या 7,000 रुपयांच्या ऐवजी 10,000 रुपयांचे वार्षिक अर्थसहाय्य दिले जाईल. केंद्रात कॉंग्रेसची सत्ता आल्यास देशात जात जनगणना केली जाईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भाषणानंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी त्यांच्या “एक्स’ हॅंडलवर म्हटले आहे की, डॉ. खुबचंद बघेल आरोग्य सहाय्य योजनेंतर्गत गरीबांना सध्याच्या 5 लाख रुपयांच्या ऐवजी 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळतील. तर इतरांना सध्याच्या 50,000 रुपयांच्या मदती ऐवजी 5 लाख रुपयांची आरोग्य मदत दिली जाईल.
राहुल गांधी म्हणाले की, कॉंग्रेस सरकार गरीब, मजूर, शेतकरी, मागासवर्गीय, आदिवासी आणि दलितांचे सरकार आहे. ते त्यांच्या हृदयाचा आवाज ऐकते. तुम्हाला बोलण्याची गरज नाही, आम्ही तुमच्या हृदयाचा आवाज ऐकू शकतो. आज सकाळी बघेल आणि मी राज्य सरकारने शेतकरी आणि मजुरांसाठी जे काम केले याबद्दल बोललो. त्यांनी आम्हाला सांगितले की कॉंग्रेस सरकारने त्यांच्यासाठी पाच वर्षांत जे केले, ते इतर कोणत्याही सरकारने केले नाही, ही कॉंग्रेसची कार्यपद्धती आहे.
तसेच कॉंग्रेस छत्तीसगडमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून जात जनगणना सुरू केली जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. कर्नाटक आणि राजस्थानमध्ये त्याची सुरुवात झाली आहे, जात जनगणनेनंतर मागासलेले लोक, दलित आणि आदिवासींचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे. त्यांच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी ऐतिहासिक कामे सुरू केली जातील, असेही ते म्हणाले.





