“दोषी असलो तर फाशी द्या…”; जय मालोकरच्या पोस्टमार्टम रिपोर्टनंतर अमोल मिटकरींचे विधान

MLA Amol Mitkari | मनसे कार्यकर्ता जय मालोकर याच्या मृत्यू प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. जय मालोकारचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने नाही तर जबर मारहाणीने झाल्याची माहिती पोस्टमार्टम रिपोर्टद्वारे समोर आली आहे. अकोल्याच्या शासकीय विश्रामगृह येथे मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली होती.
यानंतर गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांपैकी जय मालोकारचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमोल मिटकरी काय म्हणाले?
“जय मालोकर या तरुणाचा मृत्यू गंभीर मारहाणीमुळे झाला हे पोस्टमोर्टम रिपोर्टमधून समोर आले आहे. हे फार वेदनादायी आणि दुर्दैवी आहे. या प्रकरणी मी जर दोषी असेल, माझ्या कुणी कार्यकर्त्याचा हात असेल तर आम्हाला थेट फासावर लटकवा. या प्रकरणी राजकारण करू नये. आम्हाला दोषी ठरवून जे काही गुन्हे असतील ते घेण्याची आमची तयारी आहे. परंतु यात जे कुणी दोषी असतील मग आम्ही असो वा त्यांच्यातील कुणी या प्रकरणी राजकारण करू नये, दोषी असल्यास भर चौकात फाशी द्या,” असं विधान आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.
पुढे ते म्हणाले, “आम्हाला या प्रकरणी पक्षीय राजकारण करायचे नाही. जयला कुणी मारलं हे जनतेसमोर सत्य येऊ द्या. सर्वांचे कॉल डिटेल्स काढा. त्याच्या संपर्कात कोण कोण होते, जय मालोकरच्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे. तेथील पूर्ण सीसीटीव्ही फुटेज बघा, त्या विद्यार्थ्याने आमच्या वाहनावर हल्ला केला नव्हता. तो मागे उभा होता. परंतु त्याच्या मृत्यूच्या शेवटपर्यंत काय झाले हे सत्य कुटुंबासमोर आले पाहिजे.”
जो कोणी दोषी असेल त्याला कठोर शासन झाले पाहिजे. जय मालोकर कुटुंबाने जी मागणी केली ती रास्त असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. त्यांच्या कुटुंबाला पूर्ण वेळ संरक्षण द्यावे अशी मागणीही आमदार अमोल मिटकरींनी केली.
काय आहे रिपोर्टमध्ये?
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये जय मालोकर याचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झाल्याचे म्हटले आहे. जय मालोकरच्या पाठीवर, छातीवर, डोक्यावर आणि मानेवर जबर मारहाण झाल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. तसेज मारहाण इतकी भयानक करण्यात आली होती की, जय मालोकर याच्या छातीच्या चार ते पाच बरगड्या मागच्या बाजूने फ्रॅक्चर होत्या.
तसेच डोक्याला देखील गंभीर मारहाण झाली आहे. पोस्टमार्टमवेळी जयच्या मेंदूला सूज होती, त्यामुळे त्याच्या मेंदूचं वजन वाढलं. मानेवर जबर मारहाणीमुळे त्याच्या मज्जातंतूंना गंभीर इजा झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. या घटनेमुळे न्युरोजेनिक शॉकमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये म्हंटल आहे.
काय घडले होते नेमके?
अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर 30 जुलैला मनसे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरी यांच्यात जोरदार राडा झाला होता. मनसे कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींची गाडी फोडली होती. यानंतर गुन्हा दाखल झालेल्या वीस कार्यकर्त्यांपैकी जय मालोकारचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचा दावा करण्यात आला होता.
कोण आहे जय मालोकार?
जय मालोकारहा मनसेच्या विद्यार्थी सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष होता. तो परभणी येथे होमिओपॅथी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाला होता. मिटकरींसोबत झालेल्या राड्याच्या ताणातूनच जयचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला होता.
हेही वाचा:





