Maharashtra Politics : “बाळासाहेब असते तर अमित शहांना गेट आऊट केलं असतं!” ‘सामना’तून तीव्र हल्लाबोल

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आज हयात असते, तर गृहमंत्री अमित शहा यांच्यावर “जीवनभर लक्षात राहील” असे कडक उपचार झाले असते, असा रोखठोक हल्ला शिवसेनेच्या मुखपत्रातून ‘सामना’ने केला आहे. शिवसेना फोडणाऱ्या शहा आणि शिंदे गटावर टीका करताना ‘सामना’ने शहा यांना “देशातील सर्वात फुसके गृहमंत्री” असे संबोधले.
संपादकीयात म्हटले आहे की, शहा यांच्याकडे विरोधकांनी विचारलेल्या गंभीर प्रश्नांची उत्तरं नाहीत. त्यांनी महाराष्ट्रात “गुलामांची पैदास” केली आणि बाळासाहेबांचे नाव घेऊन जनभावना विकत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर त्यांनी सिंदूर पुसणाऱ्या अतिरेक्यांवरील निष्क्रियतेबद्दल शहांचा राजीनामा थेट पंतप्रधानांकडे मागितला असता.
“26 हिंदू महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसले गेले, अतिरेकी मोकाट फिरतात, आणि गृहमंत्री केवळ विरोधकांचे पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत”, अशी टीका करताना, हेच बाळासाहेब ठाकरे असते तर ते संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी करून सरकारला जाब विचारले असते, असे ‘सामना’ने ठासून सांगितले.
अमित शहांनी नुकतेच जाहीर केले की बाळासाहेब असते तर त्यांनी मोदींना गळामिठी दिली असती. या वक्तव्यावर टीका करताना सामना म्हणतो, “ही कल्पनाच बाळासाहेबांचा अपमान करणारी आहे.” कारण बाळासाहेबांचे हिंदुत्व हे सत्तेसाठी नव्हते, तर स्वाभिमानासाठी होते, हे ‘सामना’ने स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले होते अमित शहा
आज बाळासाहेब ठाकरे असते तर ऑपरेशन सिंदूर नंतर नरेंद्र मोदी यांची गळा भेट घेत घेतली असती. नरेंद्र मोदी यांनी ठरवलं आहे, 2047 पर्यंत भारत विकसीत होईल, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत, या पाच वर्षांत मराठवाड्यातील प्रत्येक गावात पाणी पोहोचेल, असं शाह यांनी यावेळी म्हटलं आहे.





