Rohit Pawar : क्रशरबाबत चुकीचा निर्णय दिल्यास पडसाद उमटतील : रोहित पवार

वाई : क्रशर प्रकरणात चुकीचा निर्णय दिल्यास त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटतील असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला. वाई तालुक्यातील खाणीप्रकरणी आंदोलन सुरु आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर सातारचे अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या अध्यक्षतेखाली क्रशर प्रकरणाची सुनावणी पार पडली.
यावेळी आंदोलकांच्यावतीने स्वप्निल गायकवाड व डॉ. नितीन सावंत यांनी बाजू मांडली. आमदार रोहित पवार यांनी सुनावणीत उपस्थित राहून ठाम भूमिका घेतली. ‘‘कागदाला कागद जोडा, कोणाच्या मर्जीखातर चुकीचा निर्णय घेऊ नका. अन्यथा याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटतील,’’ असा इशारा त्यांनी दिला. ‘‘या आंदोलनातील महिला, वृद्ध, तरुणांना मी शब्द दिला आहे. न्याय मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही,’’असेही त्यांनी केली.
शासनाकडून २०२२ मध्ये दिलेली खाण परवानगी आणि २०२४ मध्ये झालेले रस्ता अधिग्रहण हे एकमेकांशी विसंगत असल्याचे मुद्दे सुनावणीदरम्यान उपस्थित करत स्वप्निल गायकवाड व नितीन सावंत यांनी हे प्रकरण बेकायदेशीर असल्याचे सांगितले.
अधिग्रहित जमिनीत ‘लागवडयोग्य क्षेत्र’ म्हणून उल्लेख असून कुठेही रस्त्याचा उल्लेख नाही, हे त्यांनी सांगितले. बफर झोन संदर्भातही महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले. शासनाच्या प्रतिनिधींनी खाणधारकांच्या बाजूने भूमिका घेतल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा दावा केला. या सुनावणीतून समितीचा अहवाल मंत्र्यांकडे सादर होणार असून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.





