UP T20 League 2025 : यूपी टी२० लीगमधील जुळ्या भावांची जोडी चर्चेत, दोघांना ओळखण्यासाठी कोचने लढवलीय अनोखी शक्कल

दोन संघ, दोन भाऊ, एकसारखे चेहरे –
यूपी टी-20 लीगमध्ये अजय आणि विजय यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अजय कुमार नोएडा किंग्सकडून खेळत आहे, तर विजय कुमार मेरठ मॅव्हेरिक्सचा भाग आहे. दोन्ही भावांच्या चेहऱ्यात इतके साम्य आहे की, मैदानावर सहखेळाडू, प्रशिक्षक आणि अगदी चाहतेही त्यांना ओळखण्यात गोंधळून जातात. अजयने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, त्यांच्या साम्यामुळे त्यांनी एका सामन्यात एकमेकांच्या जागी फलंदाजीही केली आहे.
प्रशिक्षकांनी ओळखण्यासाठी काढलाय एक मजेदार तोडगा –
View this post on Instagram
अजयने हसत हसत सांगितले की, त्यांच्या चेहऱ्यातील साम्यामुळे प्रशिक्षकांसमोर एक अनोखी समस्या निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून प्रशिक्षकांनी एक मजेदार तोडगा काढला आहे. ते दोन्ही भावांच्या हातावर वेगवेगळ्या रंगांचे रिबन बांधतात, जेणेकरून सराव किंवा सामन्यादरम्यान त्यांची ओळख पटवणे सोपे होते. हा छोटासा उपाय केवळ प्रशिक्षकांसाठीच उपयुक्त ठरला नाही, तर त्यामुळे अजय आणि विजय यांची कहाणी आणखी रंजक बनली आहे. विशेष बाब म्हणजे, यूपी टी-20 लीग 2025 चा 14 वा सामना मेरठ मॅव्हेरिक्स आणि नोएडा किंग्स यांच्यात झाला. या सामन्यात हे दोन्ही भाऊ एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरले.
विजय कुमारने केले आहे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण –
अजय कुमार आणि विजय कुमार यांचे वय सध्या 19 वर्षे आहे. विजय कुमारने गेल्या वर्षी उत्तर प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 3 प्रथम श्रेणी सामने खेळले असून, त्यात त्याने 6 विकेट्स घेतल्या असून 17 धावा केल्या आहेत. या जुळ्या भावंडांची अनोखी कहाणी आणि मैदानावरील कामगिरी यूपी टी-20 लीगला एक वेगळीच मजा आणत आहे. चाहत्यांनाही या दोघांच्या खेळीची आणि त्यांच्या साम्याची उत्सुकता लागून राहिली आहे.





