ICC Test Rankings, Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालने कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्ध सलग दोन द्विशतके झळकावणाऱ्या जयस्वालने क्रमवारीत 14 स्थानांची प्रगती केली असून, यासह तो 15वा क्रमांकाचा कसोटी फलंदाज बनला आहे.
यासह तीन भारतीय खेळाडूंनी वनडे क्रमवारीत टॉप-5 मध्ये प्रवेश केला आहे. ज्यामध्ये शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे. कसोटी आणि एकदिवसीय क्रमवारीत भारतीय फलंदाजांना फायदा झाला आहे.
जैस्वालने इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात द्विशतक झळकावले होते. विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात जैस्वालने भारताच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना 209 धावा केल्या. यानंतर, राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत, दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याने नाबाद 214 धावा केल्या. याशिवाय जयस्वालने हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीतही 80 धावांची खेळी केली होती.
कसोटी क्रमवारीत टॉप-5 बद्दल बोलायचे झाले तर न्यूझीलंडचा केन विल्यमसन 893 रेटिंगसह अव्वल स्थानावर आहे. याशिवाय स्टीव्ह स्मिथ 818 रेटिंगसह दुसऱ्या, डॅरिल मिशेल 780 रेटिंगसह तिसऱ्या, बाबर आझम 768 रेटिंगसह चौथ्या आणि इंग्लंडचा जो रूट 766 रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे.
वनडे क्रमवारीतही भारतीय फलंदाजांचे वर्चस्व…
एकदिवसीय क्रमवारीत भारताचा सलामीवीर शुभमन गिल 801 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर, विराट कोहली 768 रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आणि रोहित शर्मा 746 रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे. या यादीत पुढे जात न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल 728 रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे. तर एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम पहिल्या क्रमांकावर कायम आहे. बाबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 824 रेटिंगसह अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे.