ICC T20 Rankings : हार्दिक पंड्याने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय क्रिकेटपटू…

ICC T20 Rankings (Hardik Pandya) :- आयसीसीने टी-२० विश्वचषक २०२४ नंतर आता टी-२० मधील नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत अंतिम सामन्यात अखेरच्या षटकात दमदार कामगिरी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करणाऱ्या हार्दिक पंड्याने मोठी झेप घेतली आहे. हार्दिकने यंदाच्या विश्वचषकात बॅट आणि चेंडू दोन्हीने चांगली कामगिरी केली. पंड्या आता टी-२० मधील जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. तो अनेक दीग्गज खेळाडूंना मागे टाकत नंबर वन अष्टपैलू खेळाडू ठरला. त्याचे रेटिंग गुण २२२ आहेत. पंड्या आणि श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा यांचे रेटिंग समान असले तरी, पंड्यालाच आयसीसीने पहिल्या क्रमांकावर ठेवले आहे.
आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या टी-२० मधील अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत हार्दिक पंड्या २२२ च्या रेटिंगसह अव्वल स्थानी आला आहे. त्याने दोन स्थानांनी झेप घेतली. पंड्याने टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आणि त्यानंतरच्या अंतिम सामनन्यात अप्रतिम कामगिरी केली होती. सामन्याचे शेवटचे षटक टाकत असताना भारतीय संघाला विजेता बनवण्यातही त्याचे मोठे मोठे योगदान होते.
पंड्या आणि हसरंगानंतर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टोनिस आहे. त्यानेही एका स्थानाने झेप घेतली आहे. तो आता या यादीत २११ रेटिंगसह तिसऱ्या स्थानी आहे. झिम्बाब्वेच्या सिकंदर रझालाही एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो २१० रेटिंगसह चौथ्या क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू बनला आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसन २०६ रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर पोहोचला.
यादरम्यान अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीला मात्र फटका बसला आहे. अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी २०५ रेटिंगसह चार स्थानांनी घसरून सहाव्या स्थानावर आला आहे. नेपाळचा दीपेंद्र सिंग १९९ रेटिंगसह सातव्या क्रमांकावर कायम आहे. इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टनने एका स्थानाची प्रगती केली. तो आता १८७ रेटिंगसह आठव्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा एडन माक्ररम १८६ रेटिंगसह ९व्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा मोईन अली आता नवव्या स्थानावरून दहाव्या स्थानावर घसरला आहे. त्याचे रेटिंग १७४ आहे.





