Womens Champions Trophy : आयसीसीचा श्रीलंकेला मोठा दणका! चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद हिरावले, स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की
Womens Champions Trophy : आयसीसीने श्रीलंकेकडून ऐतिहासिक पहिल्या 'विमेन्स चॅम्पियन्स ट्रॉफी'चे यजमानपद काढून घेतले आहे

ICC Strips Sri Lanka Of Womens Champions Trophy 2027 Hosting Rights : भारताविरुद्धची कोलंबो कसोटी अनिर्णित राखल्याचा आनंद साजरा करत असतानाच श्रीलंका क्रिकेटवर (SLC) मोठे संकट कोसळले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अत्यंत कठोर पाऊल उचलत श्रीलंकेकडून १४ ते २८ फेब्रुवारी २०२७ दरम्यान होणाऱ्या ऐतिहासिक पहिल्या ‘विमेन्स चॅम्पियन्स ट्रॉफी’चे (Women’s Champions Trophy) यजमानपद काढून घेतले आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डातील वाढता सरकारी हस्तक्षेप आणि वारंवार सूचना देऊनही वेळेवर निवडणुका न घेतल्याने आयसीसीने ही मोठी कारवाई केली आहे.
सरकारी हस्तक्षेप अन् निवडणुका न घेणे नडले; बैठकीतूनही केले होते बेदखल –
श्रीलंका सरकारने स्थापन केलेल्या ‘ट्रान्सफॉर्मेशन कमिटी’चा क्रिकेट बोर्डाच्या प्रशासनात आणि संविधानात वाढता हस्तक्षेप आयसीसीला अजिबात मान्य नव्हता. वारंवार आदेश देऊनही बोर्डाच्या निवडणुका घेतल्या गेल्या नाहीत. यापूर्वीही आयसीसीने श्रीलंकन प्रतिनिधींना आपल्या बोर्ड बैठकीत सहभागी होण्यापासून रोखले होते. श्रीलंका क्रिकेट ट्रान्सफॉर्मेशन कमिटीचे सचिव प्रकाश शॅफ्टर यांनी ही स्पर्धा श्रीलंकेबाहेर हलवण्यात आल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला असून, नव्या यजमान देशाची घोषणा लवकरच केली जाणार आहे.
रँकिंगमध्ये ७ व्या स्थानावर; श्रीलंकेवर स्पर्धेतूनच बाहेर पडण्याची वेळ –
ICC Strips Sri Lanka of Women’s Champions Trophy Hosting Rights https://t.co/m6VE3OMbma
— NewsWire 🇱🇰 (@NewsWireLK) August 30, 2026
एकूण ६ संघांचा समावेश असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आयसीसी रँकिंगमधील अव्वल ५ संघ आणि यजमान देशाला थेट प्रवेश दिला जाणार होता. यजमान असल्यामुळे श्रीलंकेला थेट प्रवेश मिळाला होता. मात्र, आता यजमानपद गमावल्यामुळे श्रीलंकेवर स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली आहे; कारण श्रीलंकेचा महिला संघ सध्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत ७ व्या क्रमांकावर आहे.
अव्वल ५ संघांचे स्थान पक्के; वेस्ट इंडिज किंवा यूएईला मिळणार संधी –
सध्याच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या अव्वल ५ संघांनी आपले स्थान पक्के केले आहे. जर आयसीसीने या अव्वल ५ देशांपैकी एकाला यजमानपद दिले, तर सहाव्या क्रमांकावरील वेस्ट इंडिजला श्रीलंकेच्या जागी थेट संधी मिळेल. दुसऱ्या बाजूला, जर आयसीसीने संयुक्त अरब अमिरातीसारख्या (UAE) देशाला यजमानपद बहाल केले, तर १५ व्या स्थानावर असूनही युएईचा संघ यजमान म्हणून थेट मैदानात उतरेल.





