ICC Test Rankings : ‘बूम-बूम बुमराह’ पुन्हा एकदा अव्वलस्थानी, ‘या’ 2 दिग्गजांना टाकलं पिछाडीवर….

ICC Test Rankings (Jasprit Bumrah) : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात धुमाकूळ घालणारा भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये जगातील नंबर-1 गोलंदाज बनला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) कसोटी क्रिकेटमधील गोलंदाजांची नवीनतम क्रमवारी जाहीर केली. यामध्ये बुमराहने दोन दिग्गजांना मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे.
The Numero Uno in the ICC Men’s Test Bowler Rankings 🔝
Jasprit Bumrah 🫡 🫡
Congratulations! 👏👏#TeamIndia | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/mVYyeioOSt
— BCCI (@BCCI) November 27, 2024
जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत आठ विकेट घेतल्या होत्या. बुमराहने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात तीन विकेट्स घेतल्या होत्या. या दमदार कामगिरीचा बुमराहला आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत मोठा फायदा झाला. त्याने दोन महान गोलंदाजांना पिछाडीवर टाकताना अव्वल स्थानावर कब्जा केला आहे.
यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा घातक वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर होता. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड दुसऱ्या तर भारताचा बुमराह तिसऱ्या क्रमांकावर होता. आता बुमराहने या दोन वेगवान गोलंदाजांना मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे. जसप्रीत बुमराहचे आता ताज्या आयसीसी क्रमवारीनुसार 883 रेटिंग गुण आहेत. तर कागिसो रबाडाचे आता 872 रेटिंग गुण आहेत. रबाडाची आता दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. याशिवाय जोश हेझलवूड 860 रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
IND vs AUS : दुसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलिया मोठा धक्का, अष्टपैलू खेळाडू झाला दुखापतग्रस्त…
याआधीही बुमराह आयसीसी कसोटी क्रमवारीत नंबर-1 गोलंदाज होता. 30 ऑक्टोबर रोजी बुमराहची अव्वल स्थानांवरून घसरण झाली होती. कागिसो रबाडा बुमराहला मागे टाकत अव्वल स्थानी विराजमान झाला होता. आता 27 दिवसांनंतर बुमराहने पुन्हा पहिले स्थान मिळवले आहे. ताज्या आयसीसी क्रमवारीत, दोन अन्य भारतीय गोलंदाजांचाही टॉप-10 मध्ये समावेश आहे. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन चौथ्या क्रमांकावर तर रवींद्र जडेजा सातव्या स्थानावर आहे.





