ICC T20 Rankings : सूर्यकुमार दुसऱ्या स्थानी कायम तर ॠतुराजची क्रमवारीत मोठी झेप….

ICC T20I Batting Rankings : झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रुतुराज गायकवाडने धमाकेदार कामगिरी केली. गायकवाडने 49 धावांची खेळी खेळली. याआधी त्याने दुसऱ्या सामन्यात नाबाद 77 धावा केल्या होत्या. गायकवाड याला त्याच्या चमकदार कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. तो आयसीसी क्रमवारीत पहिल्या दहामध्ये पोहोचला आहे. गायकवाडने फलंदाजांच्या टी-20 क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे तर सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर कायम आहे.
गायकवाडने टी-20 फलंदाजी क्रमवारीत 13 स्थानांनी झेप घेतली आहे. तो आता 7 व्या क्रमांकावर आला आहे. गायकवाड याला 662 रेटिंग मिळाले आहे. सूर्यकुमार दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. त्याला 821 रेटिंग मिळाले आहे. यशस्वी जैस्वालला क्रमवारीत फटका बसला आहे. त्यांची तीन स्थानांची घसरण झाली आहे. यशस्वी संयुक्तरित्या 10 व्या क्रमांकावर आहे. रिंकू सिंगला टी-20 क्रमवारीत 4 स्थानांचा फायदा झाला आहे. तो 39 व्या क्रमांकावर आला आहे.
गायकवाडने झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात नाबाद 77 धावा केल्या होत्या. 47 चेंडूंचा सामना करताना त्याने 11 चौकार आणि 1 षटकार लगावला. गायकवाडने तिसऱ्या सामन्यात 28 चेंडूंचा सामना करत 49 धावा केल्या होत्या. या काळात त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले होते. आता भारतीय संघ शनिवारी चौथा टी-20 सामना खेळणार आहे. यानंतर ती रविवारी पाचवा सामना खेळणार आहे.
गायकवाड अशीच चांगली कामगिरी करत राहिल्यास टीम इंडियामध्ये त्याची जागा निश्चित होईल. त्याने भारतासाठी आतापर्यंत 22 टी-20 सामने खेळले आहेत. या कालावधीत 633 धावा केल्या आहेत. गायकवाडने एक शतक आणि 4 अर्धशतकेही केली आहेत. त्याने 6 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. देशांतर्गत टी-20 सामन्यांमध्येही त्याची चांगली कामगिरी दिसून आली आहे. गायकवाडने 139 टी-20 सामन्यात 4 हजार 751 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 6 शतके आणि 32 अर्धशतके केली आहेत.





