ICC ODI Rankings : ‘…म्हणून रोहित-विराटचं नाव वनडे क्रमवारीतून गायब’, आयसीसीने दिले स्पष्टीकरण

ICC clarification on ODI Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी (18 ऑगस्ट 2025) जाहीर केलेल्या वनडे खेळाडूंच्या क्रमवारीत आश्चर्यकारक घटना घडली. भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची नावे काही काळासाठी फलंदाजांच्या यादीतून गायब झाली होती. एवढेच नव्हे, तर हे दोन्ही खेळाडू टॉप-100 फलंदाजांच्या क्रमवारीतही दिसले नाहीत. आता यावर आयसीसीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
गत आठवड्यात हे दोघे टॉप-5 मध्ये होते, त्यामुळे ही बाब चाहत्यांच्या नजरेस पडताच सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला. चाहत्यांनी प्रश्न उपस्थित केला की, ही तांत्रिक चूक आहे की आयसीसीने खरोखरच ही नावे क्रमवारीतून काढून टाकली आहेत? प्रत्यक्षात, ही त्रुटी तांत्रिक समस्येमुळे उद्भवली होती.
आयसीसीने मान्य केली चूक –
रोहित आणि विराट यांच्या नावांबाबत झालेली चूक काही वेळातच दुरुस्त करण्यात आली. आयसीसीने याबाबत स्पष्टीकरण देताना ही चूक मान्य केली. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना आयसीसीच्या एका प्रवक्त्याने सांगितले, “आज आमच्या क्रमवारी यादीत तांत्रिक चूक झाली होती, परंतु ती दुरुस्त करण्यात आली आहे.”
हेही वाचा – Babar Azam : बाबर-रिझवानला पीसीबीचा मोठा धक्का! आशिया कपच्या संघानंतर सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये दिला झटका
सध्या भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा 784 गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे, तर विराट कोहली 736 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल 784 गुणांसह पहिल्या क्रमांकाचा वनडे फलंदाज आहे. भारताने आपला शेवटचा वनडे सामना मार्च 2025 मध्ये खेळला होता.
केशव महाराज गोलंदाजांमध्ये अव्वल –
दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजने ताज्या क्रमवारीत अव्वल वनडे गोलंदाजाचा मान पटकावला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात महाराजने 33 धावांत 5 गडी बाद केले होते. यामुळे त्याने भारताचा कुलदीप यादव आणि श्रीलंकेचा महिश तीक्ष्णा यांना मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला. यापूर्वी 2023 मध्येही महाराज अव्वल स्थानावर होता.
जेडन सील्सची मोठी झेप –
गोलंदाजांच्या यादीत कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा हे दोन भारतीय टॉप-10 मध्ये आहेत. जडेजा नवव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडन सील्स यानेही गोलंदाजी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामन्यात त्याने 18 धावांत 6 गडी बाद केले होते. त्यामुळे तो 15 स्थानांची झेप घेत 18व्या क्रमांकावर पोहोचला.





