IAS M Devendra Singh Suspended : महाराष्ट्र विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात मुंबईत राजकीय घडामोडी जोरात सुरू आहेत. पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) च्या सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंग (IAS, २०११ बॅच) यांना ब्रीफिंगसाठी बोलावले होते. मात्र, त्यांच्या आदेशानंतरही ते उपस्थित राहिले नाहीत, यामुळे त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. काय आहे निलंबनाचे कारण? विधानसभेतील चर्चेदरम्यान पंकजा मुंडे यांनी हे प्रकरण उचलले. त्यानंतर तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी निलंबनाचे आदेश दिले. सामान्य प्रशासन विभागाकडून अतिरिक्त सचिव व्ही. राधा यांच्या सहीने हा आदेश जारी करण्यात आला. अखिल भारतीय सेवा (शिस्त व अपील) नियम, १९६९ च्या नियम ३(१)(a) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. आदेशात म्हटले आहे की, शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित असल्याने तत्काळ प्रभावाने निलंबन लागू करण्यात येत आहे. त्याचबरोबर सहसंचालक IAS सतीश पडवळ यांना देखील निलंबीत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यांपैकी एम. देवेंद्र सिंग यांच्या निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी सही केल्यानं आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबन काळातील अटी मुख्यालय मुंबई राहील. कोकण विभाग, मुंबई विभागीय आयुक्तांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. कोणतीही खासगी नोकरी, व्यापार किंवा व्यवसायात सहभागी होता येणार नाही. निलंबन काळात निर्वाह भत्ता, महागाई भत्ता इ. मिळतील, पण त्यासाठी इतर नोकरी/व्यवसाय नसल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. अटींचे उल्लंघन झाल्यास गैरवर्तन समजून पुढील शिस्तभंगाची कारवाई होईल. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “एक IAS अधिकारी मंत्री महोदयांना ब्रीफिंग देण्यासाठी येणार नाही असे म्हणतो, हा संविधानाचा अपमान आहे. कालच अध्यक्षांनी निलंबनाचे आदेश दिले होते आणि २४ तासांत कारवाई झाली. भविष्यात अशा अधिकाऱ्याला जेलमध्ये टाकायला हवे. काही अधिकारी अहंकारी झाले आहेत, त्यांना वाटतं ‘आमदार बदलत राहतात, आम्ही राहतो’. सन्मान द्या आणि सन्मान घ्या.” मुनगंटीवारांनी “गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना अद्दल घडलीच पाहिजे” असा टोलाही लगावला. कोण आहेत एम. देवेंद्र सिंग? एम. देवेंद्र सिंग हे MPCB चे सदस्य सचिव आहेत आणि प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळतात. मंत्री पंकजा मुंडे यांनी अधिवेशनात मुंबईतील वायू प्रदूषण, कचरा व्यवस्थापन, प्रदूषित पाण्याचे पुनर्वापर यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. हे प्रकरण अधिवेशन काळात अधिकाऱ्यांच्या जबाबदारी आणि मंत्र्यांच्या अधिकारांबाबत चर्चेला उधाण आणणारे ठरले आहे.