‘मला कोणीही मुख्यमंत्री झालं तर आवडेल…’; ‘त्या’ प्रश्नावर अमृता फडणवीसांचं स्पष्ट उत्तर

मुंबई – पुण्यात झालेल्या एका मुलाखतीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला 100 टक्के आवडेल, असे विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. अजित पवारांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय भूकंपाच्या चर्चा खऱ्या ठरतील का? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. पुढे अजित पवार म्हणाले की, “मी 2024 ची वाट कशाला बघू आतादेखील राज्याचा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारायला तयार आहे’. असं ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, या सगळ्या घडामोडींनंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी ‘अमृता फडणवीस’ यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या. ‘अजित पवार मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला आवडेल का?’ असा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर अमृता यांनी आपली भूमिका मांडली. “मला कोणीही मुख्यमंत्री झालं तर आवडेल. महाराष्ट्रासाठी 24 तास झोकून देऊन काम करणारा कोणताही माणूस मला मुख्यमंत्री झालेला आवडेल..’, असं उत्तर अमृता फडणवीस यांनी दिलं.
तसेच यावेळी त्या पुढे म्हणल्या, “मला वाटतं महाराष्ट्र आपला असा राज्य आहे जे खूप काही करू शकतं, खूप काही करत आहे. यासाठी जो माणूस आपल्याला जनतेला, जी पार्टी पुढे येते, त्या पार्टीला ठीक वाटला, जर न्याय देऊ शकेल असं वाटलं, तर ते चांगलं आहे. तो कोणीही असला तरी चालेल..’ असं उत्तर अमृता फडणवीस यांनी यावेळी दिल आहे.





