मी आता कुणाला राखी बांधू…! लेकीच्या रक्षाबंधनाच्या हट्टापायी आई-वडिलांनी चक्क मुलाचे केले अपहरण

दिल्ली – येत्या काही दिवसांवर रक्षाबंधनाचा सण आला आहे. यानिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. एका दाम्पत्याच्या मुलीने रक्षाबंधनाला मी कोणाला राखी बांधू अशी विचारणा केली होती. यावर मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी या दाम्पत्याने थेट लहान मुलाचे अपहरण केले आहे. या घटनेची फिर्याद दिल्यानंतर मुलाचा शोध घेण्यात आला. त्यानंतर या दाम्पत्याला अटक करण्यात आली.
हे दाम्पत्य टागोर गार्डनमधील रघुबीर नगरचे रहिवाशी आहेत. संजय टॅटू मेकिंगचे काम करतो, तर अनिता गुप्ता मेहिंदी क्लासेस घेते. दाम्पत्य मुलाच्या मृत्यूमुळे दु:खी होते. त्यांच्या 17 वर्षांच्या मुलाचे मागील वर्षीच निधन झाले होते. त्यांना एक 15 वर्षाची मुलगी आहे.
तिने आई-वडिलांकडे मी आता कुणाला राखी बांधू अशी विचारणा केली. दाम्पत्याला यामुळे एका मुलाचे अपहरण करण्याचा विचार आला. मुलीला भाऊ मिळेल आणि आपल्यालाही मुलगा मिळेल या आशेने त्यांनी अपहरणाचा प्लॅन केला. पोलिसांना गुरुवारी एका लहान मुलाच्या अपहरणाची माहिती मिळाली होती.
फूटपाथवरील एका दिव्यांग महिलेने पोलिसात मुलगा चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. महिलेने सांगितलं की, ती जेव्हा सकाळी उठली तेव्हा तिला तिचा लहान मुलगा दिसला नाही. मुलाचे कोणी अपहरण केल्याचा संशय आल्याने तिने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी लगेच प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांनी घटनास्थळीचा सीसीटीव्ही तपासला.
सीसीटीव्हीमध्ये पोलिसांना बाईकवर आलेले एक जोडपे दिसले. त्यांनी झोपलेल्या महिलेच्या बाजुला असलेल्या मुलाला उचलले होते. पोलिसांनी त्यानंतर जवळपास 400 सीसीटीव्ही तपासले. त्यातून त्यांना बाईक क्रमांक आणि बाईक नेमकं कुठे गेली हे कळालं. त्यानंतर पोलिसांनी संशयीत घरावर छापा टाकला. त्यांना घरी अपहरण झालेले बाळ सापडले. त्यानंतर पोलिसांनी दाम्पत्याला अटक केली आहे.





