Ranjit Kasale : ‘मी शरण येणार, पण सगळे आरोप सिद्ध करून दाखवणार’; रणजित कासलेंच्या व्हिडिओने कोणाची विकेट पडणार?

Ranjit Kasale : वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर मिळाल्याचा दावा करणारा फरार निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले बीड पोलिसांना शरण येणार आहे. याबाबतची माहिती त्याने स्वतःच व्हिडीओ पोस्ट करत दिली आहे. मी २० वर्षे सायबर पोलीस दलात काम केले आहे. पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरी मी त्यांच्या हाती लागणार नाही. मी दररोज दोन गाड्या वापरुन लोकेशन बदलत आहे. पोलिसांनी कितीही प्रयत्न केले, तरी मी त्यांच्या हाती लागणार नाही, असा दावा रणजीत कासले याने केला होता. पण आता त्यांनी मी शरण येणार असल्याचे सांगितले आहे.
रणजित कासले यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे की, मी कालपासून माझ्या कमेंट्स वाचल्या त्यानंतर मी काही पत्रकार मित्र, वकील आणि काही पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. मला असे जाणवले की पळून काही उपयोग होणार नाही. मी आजपर्यंत कुठल्याही संकटाचा सामना केला आहे. त्याप्रमाणे मी आता याला देखील सामोरे जाणार आहे. मी महाराष्ट्र पोलिस आणि बीड पोलिसांसमोर सरेंडर होण्याचा निर्णय घेतला आहे. कारण सिस्टिमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही हे मला जाणवले आहे, असं रंजीत कासले याने म्हटले आहे.
तसेच, आपले दोन्ही मोबाईल लवकरच सुरु करणार असल्याचेही त्यांने यावेळी सांगितले. मी ज्यांच्यावर आरोप केले तेच आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंडे वॉशिंग मशिनमधून क्लीन होऊन बाहेर येणार आहेत. आणि माझाच बळी जाणार आहे. आणखी दोन-चार गुन्हे दाखल होतील, असे म्हणत मी केलेले आरोप सिद्ध करुन दाखवणार असल्याचा दावाही रंजीत कासलेने केला आहे.
रणजित कासलेचा आरोप काय?
वाल्मिकच्या एन्काऊंटरची सुपारी मिळाल्याचा दावा पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केला आहे. सध्या रणजित कासले हे निलंबित आहेत. परळी नगर परिषदेचे गटनेते म्हणून कार्यरत राहिलेल्या वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची सुपारी मला देण्यात आली होती, असं कासलेने म्हटलं आहे. वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी पाच कोटी, दहा कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिल्याचं रणजीत कासले म्हणाले. कासलेने आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करत हा धक्कादायक दावा केला आहे. एवढेच नाहीतर “राज्यातील अनेक एन्काऊंटर बोगस होते”, असा दावादेखील कासले यांनी केला आहे.





