Harris after meeting Netanyahu (Washington) | : ‘गाझाच्या मानवतावादी आपत्तीवर मी गप्प बसणार नाही’ असे विधान अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी केले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या की, ‘इस्रायलला स्वत:चा बचाव करण्याचा अधिकार आहे, पण तो कसा केला जातो हे महत्त्वाचे आहे. गाझामधील मानवतावादी आपत्तीबद्दल यावेळी त्यांनी चिंता व्यक्त केली, ज्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक मरत आहेत. कमला हॅरिस यांनी स्पष्टपणे सांगितले की, गाझामधील लोकांच्या समस्यांकडे आपण डोळेझाक करू शकत नाही.
‘हमास ही क्रूर दहशतवादी संघटना’
कमला हॅरिस म्हणाल्या की, ‘मी हे अनेकवेळा सांगितले आहे, पण त्याची पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे. इस्रायलला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे, पण तो कसा करतो हे महत्त्वाचे आहे. हमास ही क्रूर दहशतवादी संघटना आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने 44 अमेरिकनांसह 1,200 निष्पाप लोकांना मारून हे युद्ध सुरू केले. हमासने लैंगिक हिंसाचार सुध्दा केला आणि 250 लोकांना ओलीस ठेवले, ज्यामध्ये अमेरिकन नागरिकांचाही समावेश होता आणि अजूनही गाझामध्ये अमेरिकन नागरिक ओलीस आहेत.
50 लाख लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर
नेतान्याहू यांच्या भेटीबाबत कमला हॅरिस म्हणाल्या की, गाझामधील नागरिकांच्या मृत्यूबद्दल त्यांनी पंतप्रधान नेतन्याहू यांच्याकडे तीव्र चिंता व्यक्त केली. हॅरिस म्हणाल्या की, ‘मी तेथील भयावह मानवतावादी परिस्थितीबद्दल माझी गंभीर चिंता व्यक्त केली. दोन दशलक्षाहून अधिक लोक तीव्र अन्नटंचाईचा सामना करत आहेत आणि पाच दशलक्ष उपासमारीच्या मार्गावर आहेत. गेल्या नऊ महिन्यांत गाझामध्ये जे काही घडले ते विनाशकारी आहे.
कमला हॅरिस म्हणाल्या की, ‘मृत मुलांची आणि हताश- भुकेले लोकांची छायाचित्र समोर येत आहेत. सुरक्षिततेसाठी लोक इकडे-तिकडे धावत आहेत. जीव वाचवण्यासाठी लोक एकदा नव्हे तीनदा-चारदा विस्थापित व्हावे लागत आहे. आम्ही या परिस्थितीकडे- शोकांतिकांकडे डोळेझाक करू शकत नाही आणि मी त्याबद्दल गप्पही बसणार नाही.
युद्धबंदी करारावर चर्चा सुरू….
हॅरिस म्हणाल्या की, ‘युद्धविराम आणि ओलिसांच्या तोडग्यासाठी एक करार झाला आहे. कराराचा पहिला टप्पा संपूर्ण युद्धविराम साध्य करण्याचा प्रयत्न करेल, ज्यामध्ये गाझामधील लोकसंख्या असलेल्या भागातून इस्रायली सैन्याची माघार देखील समाविष्ट असेल. दुसऱ्या टप्प्यात, इस्रायली सैन्य गाझामधून पूर्णपणे माघार घेतील, ज्यामुळे शत्रुत्वाचा कायमचा अंत होईल.
अमेरिकेच्या उपाध्यक्षा आणि आता राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस म्हणाल्या की, ‘हे युद्ध संपवण्याची वेळ आली आहे आणि ते अशा प्रकारे संपले पाहिजे की इस्त्रायल सुरक्षित असेल, सर्व ओलीस सोडले जातील, गाझामधील पॅलेस्टिनी लोकांचे दुःख संपू जाईल आणि पॅलेस्टिनी लोक स्वातंत्र्य, सन्मान आणि आत्मनिर्णयाचा हक्क बजावू शकतील. या करारावर सहमती देण्यासाठी चर्चा आशावादीपणे सुरू आहे.