US Presidential Election : अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (२५ जुलै २०२४) सांगितले की, उपराष्ट्रपती कमला हॅरिस या देशावर राज्य करण्यास पात्र नाहीत. कमला हॅरिस या संभाव्य उमेदवार झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या निवडणूक रॅलीला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्ध्यावर हा धारदार हल्ला चढवला.
अध्यक्ष जो बिडेन यांनी गेल्या आठवड्यात अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीतून आपले नाव मागे घेतले होते, त्यानंतर कमला हॅरिस यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. कमला हॅरिस आता संभाव्य डेमोक्रॅटिक उमेदवार आहेत आणि ऑगस्टमध्ये होणाऱ्या ‘डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शन’मध्ये पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराची अधिकृतपणे घोषणा केली जाणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘कमला हॅरिस या अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात उदारमतवादी निवडून आलेल्या राजकारणी आहेत. त्या अतिउदारमतवादी राजकारणी आहेत. त्या बर्नी सँडर्सपेक्षाही अधिक उदारमतवादी आहेत. माजी राष्ट्रपतींनी आरोप केला की, ‘जर त्या कधी सत्तेवर आल्या तर त्या या देशाला लवकर उद्ध्वस्त करतील आणि आम्ही हे होऊ देणार नाही.
ट्रम्प म्हणाले की, हॅरिस या सीमेच्या प्रमुख होत्या, पण त्या कधीच सीमेवर गेल्या नाहीत. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘जर कमला या तुमच्याशी जो बिडेन यांच्या मानसिक अपंगत्वाबद्दल खोटे बोलू शकतात, तर त्या तुमच्याशी कोणत्याही गोष्टीबद्दल खोटे बोलू शकतात. त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवता येणार नाही. कुटिल जो बिडेनप्रमाणेच कमला हॅरिस यासुध्दा नेतृत्वासाठी अयोग्य आहेत. त्या एका वर्षात आपला देश नष्ट करतील.
ते पुढे म्हणाले की, ‘या नोव्हेंबरमध्ये अमेरिकन लोक त्यांना सांगतील, पुरे झाले कमला, धन्यवाद. तुम्ही खूप वाईट काम केले आहे. तुम्ही काहीही केले तरी तुमची कामगिरी खूपच खराब झाली आहे. तुम्ही अतिउदारमतवादी आहात. आम्हाला तूम्ही इथे नको आहात. आम्हाला तूम्ही कुठेही नको आहात.