मीच रायगडचा पालकमंत्री होणार; मंत्री भरत गोगावले

मुंबई : मी 100 टक्के रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री होणार, असा आत्मविश्वास शिवसेनेचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला. ते आज विधानभवनात माध्यमांशी बोलत होते. कुणीतरी बालहट्ट सोडावा, बालहट्ट सोडला तर एका मिनिटात निर्णय होईल, असा टोलाही आदिती तटकरे यांना नाव न घेता लगावला. सरकारकडून पालकमंत्र्यांची घोषणा केल्यानंतर आदिती तटकरे यांच्याकडे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद गेले होते.
परंतु, यामुळे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले नाराज झाले. त्यानंतर सरकारने रायगडच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली होती. तेव्हापासून हा तिढा कायम आहे. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावर दावा केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसही या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी दावा सांगत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आज भरत गोगावले यांनी केलेल्या दाव्यामुळे तीन महिन्यांपासून रखडलेला रायगड जिल्ह्याचा पालकमंत्रिपदाचा वाद लवकरच सुटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी रायगड जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्याबरोबर शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील होते. या दोघांनी सुरुवातीला महाड येथील चवदार तळ्याला भेट दिली. त्यानंतर पुढील कार्यक्रमाला जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे यांनी एकाच वाहन घेत प्रवास केला. हा प्रवास चर्चेचा विषय ठरला होता. या प्रवासात रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत चर्चा झाली असणार, असा अंदाज बांधला गेला होता.





