Satara: “मुलगा आणि भाऊ म्हणून सदैव पाठीशी उभा राहीन” उदयनराज भोसले; आंबेनळी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन
Satara उदयनराजे भोसले यांनी मृतांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. ‘मी त्यांच्या मुलाची किंवा भावाची जागा कधीच भरून काढू शकत नाही. मात्र, मुलगा आणि भाऊ या नात्याने सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन,’ अशी भावनिक ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Satara: आंबेनळी घाटातील भीषण अपघातात आठ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या हृदयद्रावक दुर्घटनेनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मृत तरुणांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेत त्यांच्या दुःखात सहभाग नोंदवला.
या अपघातात मर्ढे येथील उत्कर्ष शिंगटे (वय २१), प्रवीण शिंगटे (वय २५), आसगाव येथील महेश पवार (वय २५), आदित्य साळुंखे (वय २१), रितेश लोखंडे (वय २५), सुहास लोखंडे (वय २०), अंश चव्हाण (वय १८) तसेच खटाव येथील संदीप काटकर (वय ३५) यांचा मृत्यू झाला. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या भीषण दुर्घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून गावागावांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
उदयनराजे भोसले यांनी मृतांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. ‘मी त्यांच्या मुलाची किंवा भावाची जागा कधीच भरून काढू शकत नाही. मात्र, मुलगा आणि भाऊ या नात्याने सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन,’ अशी भावनिक ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
सांत्वन भेटीदरम्यान परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवंगत तरुणांना श्रद्धांजली अर्पण केली. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते. तर संपूर्ण वातावरण शोकमग्न झाले होते.
ही घटना अत्यंत वेदनादायी असून संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी मोठा धक्का आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यांना शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.”





