Supriya Sule : आरक्षण मागायला मला लाज वाटली पाहिजे; सुप्रिया सुळेंचं विधान चर्चेत

Supriya Sule : राज्यात मराठा आणि ओबीसी समाजातील आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा समाजासाठी सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला असून, दसऱ्यानंतर आंदोलनाचा इशारा दिला आहे. याचवेळी बंजारा समाजही एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आरक्षणावर मोठं आणि खळबळजनक विधान केलं आहे.
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शिक्षण आणि सुविधांपासून वंचित असलेल्यांनाच आरक्षण मिळायला हवं. माझे कुटुंब सुशिक्षित आहे, माझ्या मुलांना चांगल्या सुविधा मिळाल्या आहेत. त्यामुळे मी जर आरक्षण मागितलं, तर मला लाज वाटली पाहिजे.” त्यांनी चंद्रपूरसारख्या भागातील मुलांचं उदाहरण देत सांगितलं की, ज्यांना सुविधा मिळाल्या नाहीत, अशा हुशार मुलांना संधी मिळायला हवी. आरक्षण हे गरज आणि गुणवत्तेच्या आधारावर असावं, असंही त्या म्हणाल्या.
जातीवर आधारित आरक्षणावर खुली चर्चा व्हावी, असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. “हा संवेदनशील मुद्दा आहे. यावर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन चर्चा करावी,” असं आवाहन त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलं आहे. ही चर्चा केवळ विधानसभेपुरती मर्यादित न राहता महाविद्यालये, सोसायट्या आणि सार्वजनिक व्यासपीठांवर व्हायला हवी, जेणेकरून सर्वांचं मत समोर येईल, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हंटल आहे.





