PM Narendra Modi: “मी सांगतो हा फक्त ट्रेलर आहे….’; महिलांसाठी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

PM Narendra Modi। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी महाराष्ट्रातील जळगाव येथे पोहोचले आहे, जिथे त्यांनी महिलांना एक मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. महिलांना प्रमाणपत्र देण्यापूर्वी पंतप्रधानांनी महिलांशी संवादही साधला आहे.
लखपती दीदींचा सन्मान करण्यासोबतच, पीएम मोदी 2,500 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करतील, ज्याचा 4.3 लाख बचत गटांच्या सुमारे 48 लाख सदस्यांना फायदा होईल. यासोबतच पीएम मोदी ₹5,000 कोटी रुपयांचे बँक कर्ज देखील वितरित करतील, ज्यामुळे 2.35 लाख बचत गटांच्या 25.8 लाख सदस्यांना फायदा होईल.
ते पुढे म्हणाले, कुठे 25 हजार कोटी आणि कुठे 9 लाख कोटी. एवढंच नाही, सरकार जी थेट मदत देते, त्यातही सुमारे 30 पटीने वाढ केली. त्याचा परिणाम असा झाला की, गावातील महिलांचं उत्पन्न वाढलं आहे आणि त्या देशाला मजबूत करत आहेत. मी सांगतो हा फक्त ट्रेलर आहे. आता आम्ही बहीण आणि मुलींच्या भूमिकेचा अजून विस्तार करणार आहोत”, असेही नरेंद्र मोदींनी सांगितले.
दरम्यान, या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे ही योजना नेमकी काय आहे? या योजनेचे स्वरुप काय आहे? याविषयीची माहिती जाणून घेऊ…
योजनेचा उद्देश काय?
केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक योजना आणल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून महिला सशक्तिकरणावर सरकारचा विशेष भर आहे. महिलांची आर्थिक, सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दीदी ही योजना राबवली जात आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे. उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा हा उद्देश समोर ठेवून ही योजना चालू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून सरकातर्फे महिलांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.
पाच लाख रुपयांपर्यंत मिळणार मदत
ही योजना महिला बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी चालू करण्यात आलेली आहे. महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न केले जाते. महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी, असाही उद्देश या योजनेमागे आहे.
या योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर स्वत:चा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. एकूण तीन कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे.
योजनेच्या लाभासाठी नेमकी अट काय?
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसायला हवा. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिला अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
योजनेच्या लाभासाठी अर्ज कसा करायचा?
लखपती दीदी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल. या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल. या आराखड्याचा तसेच लखपती दीदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल. त्यानंतर सर्व अटींची पूर्तता होत असेल तर महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल.





