नवी दिल्ली : कुणाच्या निवृत्तीविषयी मी कधीच बोललो नाही, अशी स्पष्टोक्ती सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरूवारी केली. त्यांनी काही दिवसांपूर्वी वयाच्या पंचाहत्तरीविषयी केलेल्या वक्तव्यावरून भुवया उंचावल्या गेल्या. तसेच, विविध तर्क-वितर्कांना उधाण आले. आता भागवत यांनी त्या चर्चांना पूर्णविराम दिल्याचे मानले जात आहे. नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी एक कार्यक्रम झाला. त्यावेळी बोलताना भागवत यांनी संघाचे ज्येष्ठ नेते दिवंगत मोरोपंत पिंगळे यांच्या एका वक्तव्याचा उल्लेख केला. पंचाहत्तरीची शाल अंगावर पडली की जबाबदारीतून मुक्त व्हावे, अशा आशयाचे ते वक्तव्य होते. भागवत यांनी त्या वक्तव्याचा संदर्भ देण्याच्या टायमिंगमुळे वेगवेगळे अंदाज वर्तवणाऱ्या चर्चांना तोंड फुटले. स्वत: भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात वयाची पंचाहत्तरी पूर्ण करणार आहेत. त्याकडे लक्ष वेधून कॉंग्रेसने भागवत यांचे वक्तव्य त्यांना स्वत:ला आणि मोदींनाही लागू होत असल्याची प्रतिक्रिया दिली. त्या पार्श्वभूमीवर, भागवत यांनी गुरूवारी स्पष्टीकरण दिले. पिंगळे यांचे बोलणे अतिशय विनोदी स्वरूपाचे असायचे. त्यांच्या वक्तव्याचा संदर्भ मी दिला होता. मी निवृत्त होईन किंवा इतर कुणी निवृत्त व्हावे असे मी कधीच म्हणालो नाही. आम्ही केव्हाही निवृत्त होण्यास तयार असतो. तसेच, संघाची इच्छा असेपर्यंत कार्य करण्यासही तयार असतो. संघामध्ये स्वयंसेवकांवर त्यांची इच्छा असो की नसो; जबाबदारी सोपवली जाते. संघ सांगेल त्याप्रमाणे आम्ही कार्य करतो, असे ते म्हणाले.