छत्रपती संभाजीनगर : आपल्यात राज्याचा मुख्यमंत्री बदलण्याची ताकद असल्याचा वादग्रस्त दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे मंत्री तथा सिल्लोडचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. माझ्यात राज्याचा मुख्यमंत्री बदलण्याची ताकद आहे. त्यामुळे मला कुत्र्याची निशाणी मिळाली तरी मी निवडून येऊ शकतो, असे ते म्हणाले. सत्तार यांनी हे विधान भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करताना केले. पण आता त्याची राज्यभर चर्चा होत आहे. सत्तार यांची नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा येथे सभा झाली. यावेळी त्यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली. माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद आहे. त्यामुळे हे असले किरकोळ लोक माझे काय करणार? त्यांच्यात माझा सामना करण्याची ताकद नाही. मी मागील 25 वर्षांत मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत. त्यामुळे जो विकासकामे करतो त्यालाच मतदान करा, असे ते म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे अब्दुल्ल सत्तार व रावसाहेब दानवे यांच्यात राजकीय शत्रूत्व आहे. ते एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांच्या झालेल्या पराभवामागेही सत्तार यांचाच काही अंशी हात असल्याचा दावा केला जातो. आता विधानसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे आपल्या पराभवाचे उट्टे काढण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी त्यांच्यावर जाती-पातीचे राजकारण करण्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, अब्दुल सत्तार छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्यांच्यापुढे सुरेश बनकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामु्ळे येथे तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार यांनी 3 वेळा या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. आता त्यांना चौथ्यांदा येथून त्यांचा विधानसभेवर जाण्याचा प्रयत्न आहे. यासाठी ते जोमाने प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे.