सिंचन प्रकल्पांच्या चौकशीची शिक्षा मला भोगावी लागली

कराड – महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांबाबत झालेल्या आरोपांवरून त्यावेळी मी या प्रकरणाची श्वेतपत्रिका काढली होती. त्याची पुढे अँटी करप्शनद्वारे चौकशी झाली. मात्र, त्यानंतर काही घडामोडी करून माझे सरकार पाडण्यात आले. त्यामुळे सिंचन प्रकल्पांच्या चौकशीची शिक्षा मला भोगावी लागली असल्याची मिश्कील टिप्पणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील-उंडाळकर, दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, शिवराज मोरे उपस्थिती होते
सिंचन घोटाळ्याबाबत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर ते पुढे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना सिंचन प्रकल्पाची माहिती मागवण्यासाठी श्वेतपत्रिका काढली होती. ती कोणताही घोटाळा उघड करण्यासाठी नव्हे, शिवाय घोटाळा हा शब्द मी कधीच उच्चारलाच नाही. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुक प्रचारसभेत महाराष्ट्रात 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याचे जाहीरपणे सांगून त्यावर शिक्कामोर्तब केले होते. यापेक्षा आणखी मोठा पुरावा काय द्यायचा, असे मत आ. चव्हाण यांनी व्यक्त केले.
मनोज जरांगे-पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दिलेल्या उमेदवारांचा निवडणुकीवर काय परिणाम होईल? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, मुळात इंग्रजांच्या काळात राजश्री शाहू महाराजांनी सर्वात प्रथम मराठा समाजाला आरक्षण दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री असताना मी पहिल्यांदा मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले होते. यावरून मराठा आरक्षणाबाबतची माझी भूमिका स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जरांगे-पाटील यांची निवडणुकीबाबत अध्याप भूमिका स्पष्ट झालेली नाही. ते मतदारसंघानुसार आपली भूमिका घेणार असल्याचे चर्चा असून अंतिम उमेदवार अर्ज जाहीर झाल्यानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जनता निर्णायक भूमिका घेईल
हरियाणातील निवडणूक निकालाचा महाराष्ट्राच्या निवडणूक व निकालावर काय परिणाम होईल? या प्रश्नावर ते म्हणाले, मुळात महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांतील निवडणुकांची तुलना होऊ शकत नाही. त्या ठिकाणची परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीवर हरियाणाच्या निवडणुकीच्या तसेच निकालाचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी व्यक्त नमूद केले. तसेच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपचा दारू पराभव केला. आता विधानसभा निवडणुकीतही येथील जनता निर्णायक भूमिका घेईल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.





