पुण्याची निधी सुखरूप पोहोचली मायदेशी; युक्रेनमधल्या बर्फवृष्टीत 30 कि.मी. केली पायपीट

सिंहगडरस्ता- रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे 18 हजार विद्यार्थी तेथे अडकून पडल्याची शक्यता आहे. याच भयभीत वातावरणात पुण्यातील सिंहगड रोड येथील जगताप कुटुंबाची कन्या सुदैवाने पुण्यात सुखरूप पोहोचली. याबाबत “प्रभात’ प्रतिनिधीने तिच्याशी केलेली बातचीत…
निधी जगताप म्हणाली, “मी तृतीय वर्ष वैद्यकीय शिक्षण घेते. गेल्या काही दिवसांपासून युक्रेनमध्ये तणावपूर्ण वातावरण होते. युद्धाला सुरुवात होताच भारताचे-आपल्या पुण्याचे, घरचे वेध लागले. त्यामुळे धोका पत्करून दि.23 ला आमचा प्रवास सुरू झाला. दि. 24ला आमचे विमान कतारवरून होते. परंतु, युद्धामुळे विमान रद्द झाले, त्यामुळे आम्हाला रोमानिया बॉर्डरवर यावे लागले. भारतीय दुतावासांशी संपर्क होत नव्हता, यासाठी 30 कि.मी. पायपीट केली. सध्या, युक्रेनमध्ये बर्फवृष्टी होत आहे.
युद्ध काय असते ते आम्ही प्रत्यक्ष पाहिले. जीवाचा थरकाप उडत होता, आमची 30 जणांची तुकडी होती. अखेर, रोमानियातील
विमानतळापर्यंत पोहचलो. दिल्ली विमानतळावर पोचल्यावर बरे वाटले. पुण्यात आल्यावर आणि आई-वडिलांना पाहून अश्रू वाहू लागले. “युक्रेनमध्ये अद्यापही हजारो विद्यार्थी अडकले आहेत. रोमानिया बॉर्डरवर अनेक विद्यार्थी परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. भारतीय दुतावास त्यांची मदत करीत आहे. आपल्या देशातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सुखरूप घरी पोहचावेत, अशीच प्रार्थना करीत आहे,’ अशा भावना निधी जगताप हिने मांडल्या.





