“पाकिस्तानात मला घरी असल्यासारखे वाटले,” वादग्रस्त विधानावर सॅम पित्रोदांनी दिले स्पष्टीकरण…

Sam Pitroda | काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. “पाकिस्तानात मला घरी असल्यासारखे वाटले,” असे वक्तव्य त्यांनी शुक्रवारी आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना केले. यासोबतच त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाने शेजारी देशांवर लक्ष केंद्रित करावे, असेही मत मांडले. त्यांच्या या विधानामुळे वादाला तोंड फुटले आहे. या एका विधानावरून भाजपला काँग्रेसवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. Sam Pitroda |
सॅम पित्रोदा यांचे स्पष्टीकरण
हा वाद आणखी वाढण्यास सुरूवात झाल्यानंतर सॅम पित्रोदा यांनी आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. पित्रोदा यांनी इनस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले की, “जर माझ्या शब्दांमुळे नाराजी निर्माण झाली असेल, तर मी हे स्पष्ट करू इच्छितो की माझा हेतू कधीही कोणाच्याही दुःखाला क्षुल्लक लेखण्याचा किंवा कायदेशीर चिंतन कमी लेखण्याचा नव्हता. माझा हेतू प्रामाणिक संवाद, सहानुभूती आणि भारत स्वतःला कसे पाहतो आणि इतर ते कसे पाहतात, यावर एक ठोस आणि जबाबदार दृष्टिकोन निर्माण करण्याचा होता.” Sam Pitroda |
View this post on Instagram
नेमकं काय म्हणाले होते पित्रोदा?
सॅम पित्रोदा म्हणाले, “भारताच्या परराष्ट्र धोरणाने प्रथम आपल्या शेजारी देशांवर लक्ष द्यावे. हे देश छोटे आहेत, त्यांना मदतीची गरज आहे, आणि त्यांच्यासोबत संघर्षाची गरज नाही. अर्थात, दहशतवाद आणि हिंसाचाराचा प्रश्न आहे, पण शेवटी या शेजारी देशांमध्ये एक सामायिक जनुकीय समानता आहे. मी स्वतः पाकिस्तानात गेलो होतो, आणि मला तिथे घरी असल्यासारखे वाटले,” असे पित्रोदा म्हणाले.
त्यांच्या या विधानावर भाजपने आक्षेप घेत, काँग्रेसवर जोरदार टीका सुरू केली आहे. शिवाय, राहुल गांधींनाही यावरून जाब विचारला जात आहे. मात्र हे प्रकरण वाढत असल्याचे लक्षात येताच पित्रोदा यांच्याकडून या विधानावर स्पष्टीकरण गेलं आहे.
सॅम पित्रोदा यांची वादग्रस्त विधाने
सॅम पित्रोदा यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहेत. फेब्रुवारी 2019 मध्ये पित्रोदांनी बालाकोट हवाई हल्ल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तर या वर्षी एप्रिलमध्ये पित्रोदा यांनी“जर दंगली झाल्या असतील तर त्या झाल्या,” असे विधान शीख दंगलींबद्दल विधान केले होते.
तर मे 2024मध्ये वर्णद्वेषी टिप्पणी केल्याने पक्षाने त्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. मात्र नंतर त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले. इतकेच काय तर “चीन हा भारताचा शत्रू नाही”, असे विधानही त्यांनी अलिकडे केले होते. या विधानामुळे देखील त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
हेही वाचा:





