Gyanesh Kumar: “ज्ञानेश कुमार राजीनामा देतील असं वाटतं नाही”; काँग्रेसचे नेत्याचा दावा, कारणही सांगितले…
Gyanesh Kumar: मतचोरी आणि निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविरोधात विरोधी पक्षांचा आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार

Gyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत जोरदार आंदोलन सुरू आहे. इंडिया आघाडीकडून राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन केले जात आहे. दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीनेही आंदोलन केल्याने दिल्लीला छावणीचं स्वरुप आलं आहे.
मात्र याचदरम्यान, काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. ज्ञानेश कुमार राजीनामा देणार नाहीत, असे स्पष्टपणे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे.
‘…तर मोदींचा पराभव होईल’
पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “निवडणूक व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. सर्व तरुण रस्त्यावर उतरले होते. सरकार घाबरलेले आहे. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्ञानेश कुमार राजीनामा देतील असं वाटत नाही. त्यांनी राजीनामा दिला तर मोदींचा पराभव होईल किंवा निवडणूका कशा झाल्या हे लोकांना समजेल,” असं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.
तसेच सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांना फक्त निवेदन द्यायचं होतं. त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटायला हवं होतं, असं मतही पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. केंद्र आणि राज्यातील सरकार खाली खेचलं पाहिजे, असेही त्यांनी यावेळी म्हंटले.
शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे राहुल गांधींचा निर्धार
दरम्यान, मतचोरी आणि निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविरोधात विरोधी पक्षांनी एकत्र येत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर मंगळवारी त्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर टीका केली. लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण करण्यासाठी शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.






