Sanjay Shirsat : ‘मला अजून बंगला नाही, लय अन्याय होतोय माझ्यावर’; संजय शिरसाट यांचं विधान चर्चेत

बदलापूर : मी अंगावर घेतले तर पूर्णपणे घेतो, कसली फिकीर करत नाही. त्यामुळे मला अजून बंगला मिळाला नाही, लय अन्याय होतोय माझ्यावर, अशी खंत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे. ‘पण मी ७२ व्या मजल्यावर राहतो आणि आज इथून झोपडपट्टी बघतो, ज्या झोपडपट्टीतून मी आधी मोठ्या इमारती पाहायचो’, असंही शिरसाट पुढे म्हणाले. Sanjay Shirsat |
बदलापूर शहरात शतकोत्तर शिवजयंती साजरी केली जाते आहे. ९८ वर्षांपूर्वी बदलापुरात साजरा झालेल्या शिवजयंती उत्सवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः उपस्थित होते. ३ मे १९२७ रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला होता. आजही ३ मे रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या शिवजयंतीचे औचित्य साधून यंदाच्या वर्षात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी शिरसाट बोलत होते.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राज्यात १२५ वसतिगृहे उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. वसतिगृहे उभारण्याच्या कामासाठी १,५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यातून राज्याच्या सर्व तालुक्यांत वसतिगृहे उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी-सुविधा व उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी आपण प्रयत्नशील आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यात वसतिगृह उभारले जाणार असल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
माझ्यावर खूप अन्याय झाले
माझ्यावर सरकारमध्ये खूप अन्याय झाले आहेत. तुम्हाला माहितीच आहे मला तर यंदा बंगलाही मिळाला नाही. मात्र मी मुंबईत स्वतःच्या घरात राहतो. मी आज ७२ व्या मजल्यावर राहतो. या घरातून मला सगळी घर मुंबई दिसते. काही वर्षांपूर्वी संघर्षाच्या काळात झोपडपट्टीतून उंच इमारती मी पाहायचो आणि आज या इमारतीमधून मी घरे पाहतो. पण हे फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे शक्य झाले आहे, असंही संजय शिरसाट यावेळी म्हणाले.





