जय-पराजयाने मला काही फरक पडत नाही – नवज्योत सिद्धु

अमृतसर – निवडणुकीतील जय किंवा पराजयाने मला काही फरक पडत नाही, पण आजही आपण पंजाबच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत आणि यापुढेही राज्यांच्या हितासाठी काम करीत राहू असे पंजाब प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धु यांनी म्हटले आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या अपमानास्पद कामगिरीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली ही प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझे ध्येय पंजाबचा विकास हे आहे.
मी पंजाबच्या समर्थनार्थ उभा होतो आणि यापुढेही त्यासाठीच उभा राहीन. पंजाबवर प्रेम करणाऱ्याला विजय किंवा पराभवाची पर्वा नसते असे त्यांनी म्हटले आहे. पंजाबमधील अमृतसर पूर्व विधानसभा मतदार संघात आप उमेदवार जीवन ज्योत कौर यांनी सिद्धू यांचा सुमारे साडे सहा हजारांच्या मतांच्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री चन्नी यांनाही दोन्ही मतदार संघात पराभव स्वीकारावा लागला आहे.





