मला युती तोडायची नाही, पण…. – उद्धव ठाकरे

मुंबई – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यास केवळ एक दिवस राहिला असताना सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. लोकसभेची युती करताना जे ठरलं होतं ते व्हावं, बाकी काही अपेक्षा नाही. मला युती तोडायची इच्छा नाही, भाजपने निर्णय घ्यावा, अशी भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. या वक्तव्याने युतीचा चेंडू आता भाजपच्या कोर्टात ढकलला आहे. यामुळे भाजप काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांची आज मातोश्रीवर बैठक झाली.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले कि, लोकसभा निवडणुकीवेळी ठरल्याप्रमाणे सर्व काही व्हावं. त्यापेक्षा मला अधिक काही नको. मुख्यमंत्रिपदाबद्दल फडणवीस यांनी केलेलं विधान चुकीचं आहे. याबद्दल भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलायला मी तयार आहे, असेही उद्धव म्हणाले. मातोश्रीवर फोन उचलले जात नसल्याचं वृत्त काही दिवसांपासून येत होतं. मात्र आता उद्धव ठाकरेंनी चर्चेची तयार दर्शवली आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी फोन करावा. त्यानंतर पुढील चर्चा करता येईल, अशी भूमिका उद्धव यांनी मांडली.
दरम्यान, शिवसेनच्या सर्व आमदारांना रंगशारदा येथे मुक्कामी ठेवण्यात येणार आहे.





