Manoj Jarange : “मी डायरेक्ट कार्यक्रम करतो…”; छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात जरांगेंनी टाकला डाव

Maharashtra Assembly Election 2024 – विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असल्याने राज्यभरात सभांचा धडाका सुरु आहे. एकीकडे राजकीय वर्तुळात प्रचार जोर धरत असतानाच मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा डावपेच आखायला सुरुवात केली आहे.
ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या येवल्या मतदारसंघाचा त्यांनी आज दौरा केला. यावेळी जरांगे यांनी सत्ता स्थापन झाल्यानंतर पुन्हा आरक्षणाचा लढा सुरु करणार असल्याची घोषणाही केली.
यावेळी ते म्हणाले, ‘ही सांत्वनपर भेट आहे. पण जाताना आता रस्त्यात गावे आहेत ते बाजूला सारू का? मी कोणाला पाडा हे सांगायला आलो नाही. मात्र मराठा समाजाला विरोध करणाऱ्यांना पाडा.
यानंतर आता कोणी आड पडत असेल तर त्यात माझा काय दोष? येवल्यात विशेष काही नाही, येवला काही राज्याच्या बाहेर नाही. माझ्या पोटात एक आणि ओठात एक अस काही नाही. मी ठरवले तर डायरेक्ट कार्यक्रम करतो’, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
सरकार स्थापन केल्यानंतर तारीख ठरवू. सरकार स्थापन करु द्या, मजा करु द्या. मग त्यांच्यासमोर मी आहेच. आरक्षण घ्यायचं आहे. माझा जीव आरक्षणात आहे.
खूप शरिराच्या वेदना आहेत, मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. जरांगेंच्या या विधानानंतर जनसमुदाय देखील स्तब्ध झाल्याचे पाहायला मिळाला.





