Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका

Raju Khare : मोहोळ तालुक्यासाठी ५९ कोटी रुपये मिळाले, आणि वर्तमानपत्रात मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुम्ही कसले पैसे आणले ? तुमचा काय संबंध? निवडणुकीत पडलाय, विधानसभेच्या सभागृहात तर मी होतो, असं सांगत आमदार राजू खरे यांनी माजी आमदार यशवंत माने यांचं नाव न घेता जोरदार टोला लगावला.
मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्रात शासनाच्या कृषी विभागाचे वतीने मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या समवेत २०२५-२६ मधील खरीप हंगामाची पूर्व तयारीची नियोजन बैठक झाली. यावेळी आमदार राजू खरे बोलत होते.
नेमकं काय म्हणाले राजू खरे?
राजू खरे म्हणाले, जिल्हा नियोजन च्या बैठकीत मोहोळ तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी पीक विम्याच्या रकमेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरले, त्यांनी दोन लेखी पत्र पाठविले. विधिमंडळात सुद्धा आवाज उठवला, कृषिमंत्र्यांना पत्रव्यवहार केला, आमदारांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्राला ६ हजार कोटी रुपये पीक विम्याचे दिले गेले.
त्यातील मोहोळ तालुक्यासाठी ५९ कोटी रुपये मिळाले, आणि वर्तमानपत्रात मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुम्ही कसले पैसे आणले ? तुमचा काय संबंध? निवडणुकीत पडलाय, विधानसभेच्या सभागृहात तर मी होतो, असं म्हणत आमदार राजू खरे यांनी माजी आमदार यशवंत माने यांना नाव न घेता टीका केली.
सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले
पुढे बोलताना म्हणाले, अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल म्हणून सर्वजण मोठ्या आशेने बघत होते; पण ती कर्जमाफी मिळाली नाही. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. लाडक्या बहिणीला जरूर पैसे द्या; पण शेतकऱ्यालाही जगविले पाहिजे असे सांगत, शासनाकडे शेतीविषयी ज्या ज्या योजना असतील त्या योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी आमदार म्हणून मी कायम प्रयत्नशील असल्याचे आमदार राजू खरे यांनी आश्वासन दिले.



