मुंबई : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे केवळ १० आमदार विजयी झाले होते. यामध्ये मोहोळचे आमदार राजू खरे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात असूनही त्यांची जवळीक ही शिंदेसेनेसोबत असल्याचे यापुर्वी अनेकदा दिसून आले आहे. काही दिवसांपुर्वी त्यांनी अजित पवारांसोबतही त्यांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या, त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये राजू खरे यांच्याबाबात नाराजी असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी राजू खरे यांना देणे ही आमची चूक होती, असे म्हणत पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून त्या उमेदवारीबाबत माफी मागण्यात आली आहे. पक्षाच्या मोहोळ विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांनी देखील राजू खरे यांच्याबाबत नाराजी व्यक्त करत त्यांच्या उमेदवारीबाबत माफी मागितली गेली. मागील काही दिवसांपासून सातत्याने राजू खरे पक्षविरोधी कृती करत असून त्यांच्याकडे आता पूर्णपणे पक्षाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली. आमदार राजू खरे सध्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा उघडपणे प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. त्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त करत तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यामुळे, आता पक्षाकडूनच अशी प्रतिक्रिया आल्यानंतर आता राजू खरे काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल. मात्र, राजू खरेंना दुसऱ्या पक्षात जायचं असल्यास पक्षांतर बंदी कायद्यानव्ये अगोदर आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागू शकतो. राजू खरे हे सोलापुरातील मोहोळचे आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी त्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत त्यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचा पराभव केला. मात्र, निवडणुका झाल्यानंतर काही दिवसांतच मी नावालाच तुतारीवाला आहे, मला चुकून तुतारी हाती घ्यावी लागली, असं वक्तव्य राजू खरे यांनी केले होते.