Navneet Rana : “इतकी कमजोर नाही की मी राज्यसभेसाठी कोणाच्या दारावर जाईल’; नवनीत राणांनी टीका करणाऱ्यांना ठणकावलं
Navneet Rana : नवनीत राणा राज्यसभेच्या तिकिटासाठी राष्ट्रवादीच्या दारात गेल्याचा दावा करत विरोधकांकडून टीका करण्यात आली होती.

Navneet Rana : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. अनेक नेत्यांची नावांची चर्चा या जागेसाठी होत होती. यामध्ये भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या देखील नावाची चर्चा होती. या चर्चा सुरू असतानाच नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली होती. या टीकेला आता नवनीत राणा यांनी आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
नवनीत राणा राज्यसभेच्या तिकिटासाठी राष्ट्रवादीच्या दारात गेल्याचा दावा करत विरोधकांकडून टीका करण्यात आली होती. या दाव्यांना त्यांनी फेटाळून लावले. एका कार्यक्रमात बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, “आमच्या विरोधात अनेक मोठे नेते आहेत. तरीही रवी राणा चौथ्यांदा आमदार झाले आहेत. राज्यसभेबाबत सुनेत्रा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानते. काही लोक म्हणाले की, मी राज्यसभेच्या तिकिटासाठी राष्ट्रवादीच्या दारात गेले. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. मी २०२४ च्या निवडणुकीतही तिकिटासाठी कोणाच्याही दारात गेले नव्हते आणि आजही जाणार नाही. मी इतकी कमजोर नाही.”
तसेच यावेळी त्यांनी आगामी राजकीय वाटचाल काय असणार याविषयी देखील मोठं वक्तव्य केलं. त्या म्हणाल्या, “पद येतात आणि जातात, पण माझी विचारधारा मी कधीही सोडणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या विचारांसाठी लढत राहीन. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मी आतापासूनच पूर्ण तयारीला लागले आहे,” असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा : Tukaram Mundhe : ‘ही तर केवळ सुरुवात’; FDA चे आयुक्त तुकाराम मुंढेंची पोस्ट चर्चेत
विद्यार्थ्यांशी असलेल्या आपल्या नात्याचाही त्यांनी उल्लेख केला. “मी खासदार असताना अनेक विद्यार्थ्यांना संसद दाखवण्याची संधी दिली. आता ते करता येत नसल्याचे दुःख आहे. मात्र, अमरावती-नागपूर मेट्रो लवकरच सुरू होईल आणि भविष्यातील विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करायला हवे,” असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ही पोटनिवडणूक जाहीर झाली होती. नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. मात्र, राष्ट्रवादीने प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांना उमेदवारी देत ही जागा कायम ठेवली. महाविकास आघाडीकडून अर्ज न आल्याने राजेंद्र जैन यांची बिनविरोध राज्यसभेवर निवड झाली.






