निर्भयाकांडाची बिहारातही पुनरावृत्ती

बलात्कारानंतर पिडितेची गोळी मारून हत्या; मूतदेह जाळला
पाटणा : हैदराबादमधील निर्भयाकांडाचे पडसाद अद्याप अंगावर कायम असतानाच तशाच घटनेची पुनरावृत्ती सोमवारी मध्यारात्री बिहारात घडली. बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील कुकुधा गावात मुलीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिच्या डोक्यात गोळी मारून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह जाळण्यात आला, अशी माहिती बक्सरचे पोलिस उपअधिक्षक सतिश कुमार यांनी सांगितले.
नागरिकांनी कंबरेच्या वर जळालेला मुलीचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळावर दाखल झाले. या मुलीची हत्या करण्यापुर्वी तिच्यावर बलात्कार केला असावा. ही घटना सोमवारी मध्यारात्री घडली असावी, असेही कुमार यांनी सांगितले आहे.
पिडितेचा चेहरा ओळखू येत नव्हता, अशा भीषण अवस्थेत होता. त्यामुळे तिचे वय आणि ओळख पटली नाही. त्याचा शवविच्छेदन अहवाल आल्यावर तिचे वय समजू शकेल. या मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिला डोक्यात गोळी घालण्यात आली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जाळण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून काडतुसाची पुंगळी जप्त केली आहे.
कंबरेच्यावर तिचा मृतदेह खूपच जळालेला असल्याने तिची ओळख पटू शकली नाही. हा मृतदेह पाहण्यासाठी शेकडो गावकरी जमा झाले होते. मात्र कोणीही तिचा मृतदेह ओळखू शकले नाहीत, त्यामुळे पोलिसांपुढील आव्हान वाढले आहे.
हैदराबाद येथे बुधवारी (दि. 27) निर्भयाकांड घडले. निर्भया आपल्या स्कूटीवरून येत असताना हैदराबाद बंगळुरू महामार्गावर त्यांच्या स्कूटीचे टायर पंक्चर केले. त्यावेळी तेथे असणाऱ्या ट्रकचालकांनी ती स्कूटी मेकॅनिककडे नेण्यास मदत करण्याचा बहाणा केला.. त्यानंतर तिने आपल्या बहिणीला फोन करून याची कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. तिचा खून करून मृतदेह 30 किमी अंतरावर नेऊन जाळून टाकला. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे.





