Karnataka : तब्बल 12 वर्षे पत्नीला घरात ठेवले होते कोंडून, पोलिसांनी केली सुटका

म्हैसूर – कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे.या प्रकरणात एका पतीने आपल्या पत्नीला गेली १२ वर्षे घरातच कोंडून ठेवले होते असा दावा करण्यात आला आहे.
तूर्त या महिलेची सुटका करण्यात आली असून तिचे समुपदेशनही केले जाते आहे. विशेष बाब म्हणजे एवढे सगळे होऊनही संबंधित महिलेने आपल्या पतीविरूध्द तक्रार दाखल करण्यास नकार दिला असून आता आपल्या आई-वडिलांकडे राहायचे आहे एवढीच इच्छा तिने व्यक्त केली आहे.
या घटनेत समोर आलेल्या माहितीनुसार या महिलेचे वय ३० असून तिला दोन मुलेही आहेत. पतीने तिला घरातच बंद केले होते. तिला बाहेर जाण्यास परवानगी नव्हती व इतर जे विधी असतात तेही तिला घरातच करावे लागत होते.
तिची मुले शाळेतून घरी यायची तेंव्हा पती कामावरून घरी परत आलेला नसायचा. मात्र मुलांनाही दार उघडून आत जाण्याची परवानगी नव्हती. आपण खिडकीतूनच मुलांशी बोलायचो आणि त्यांना खायला द्यायचो असे महिलेचे म्हणणे आहे.
आता या महिलेची सुटका केल्यानंतर पुढील तपास सुरू आहे. पतीने असे का केले याचा तपास केला जातो आहे तसेच महिलेच्या दाव्यांचीही पडताळणी केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या प्रकरणात आपल्याला पतीविरूध्द तक्रार द्यायची नसल्याचेही महिलेने म्हटले असल्याचे पोलिसांनी नमूद केले.





