हिवाळी अधिवेशनात सोमवारी ‘हल्लाबोल’; महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक

नागपूर – नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. या विविध प्रश्नांसंदर्भात नागपूर विधानभवनावर कॉंग्रेसच्या वतीने सोमवारी ‘हल्लाबोल’ मोर्चा काढण्यात येणार आहे.
विदर्भातील नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. खोकेबाज, धोकेबाज, चालबाज सरकारच्या विरोधात मोर्चा अशी टॅगलाईन या मोर्च्याला देण्यात आली आहे.
राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही. ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपाप्रणित शिंदे सरकार जनतेच्या या मुलभूत प्रश्नांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
जनतेला वा-यावर सोडून विदर्भात फक्त पर्यटनाला आलेल्या बेजबाबदार महाराष्ट्रविरोधी भाजपा व फुटीरांच्या सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा भव्य ‘हल्लाबोल’ मोर्चा सोमवारी काढण्यात येणार असल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले आहे.
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन दिवसांच्या कामकाजात सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चाही केली नाही. केवळ शेतकऱ्यांना भरपूर दिले आहे अशा पोकळ घोषणा मुख्यमंत्री व त्यांचे मंत्री देत आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. स
रकार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटोसेशन करुन आले पण अजून कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. याआधीच्या नुकसानीची मदतही अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. पीकविम्याचे पैसेही मिळालेले नाहीत. राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. अपहरण, हत्या, महिला अत्याचारात महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक असल्याचे एनसीआरबीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
प्रमुख मागण्या…
शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी
रखडलेली नोकर भरती करावी
शेतमालाला योग्य भाव द्यावा
धानाला एक हजार बोनस द्यावा
हमीभावाने शेतमाल खरेदी केंद्रे सुरु करावीत
कांदा निर्यात बंदी उठवावी
इथेनॉल निर्मितीवर लावलेली बंदी उठवावी
आरक्षणाचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत





