HSRP Number Plate: पुणेकरांनो सावधान! वाहनाला ‘एचएसआरपी ‘ नंबर प्लेट नसेल तर ‘इतके’ रुपये दंड; आरटीओची कारवाई सुरू
HSRP Number Plate: पुणे आरटीओ अंतर्गत २६ लाख वाहनांपैकी केवळ ९ लाख वाहनांनाच बसली नंबर प्लेट; अजूनही लाखो वाहनचालक दंडाच्या कचाट्यात येण्याची शक्यता.

HSRP Number Plate – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक आहे. त्याबाबत राज्य परिवहन विभागाकडून मागील दीड वर्षात सहा वेळा मुदतवाढ दिली. त्यामध्ये ३० जून ही अंतीम मुदत संपली असून, मुदत संपताच पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे शहरात विना एचएसआरपी प्लेट असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरवात केली.
१ जुलैपासून सुरू कारवाई सुरू करण्यात आली असून अशा वाहन चालकांकडून प्रत्येकी एक हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. पुणे शहरात आजही १४ लाख ५० हजार वाहने विना एचएसआरपी धावत आहेत. त्यामुळे एचएसआरपी नसलेल्या वाहनांची आरटीओ कार्यालयातील मालकी हस्तांतरण, पत्ता बदलणे, कर्जबोजा चढवणे/उतरवणे आणि परवाना नूतनीकरण यांसारख्या महत्त्वाच्या सेवा बंद होणार आहेत.
ज्या वाहनधारकांनी ३० जून किंवा त्यापूर्वी ऑनलाइन नोंदणी करून अपॉइंटमेंट बुक केली आहे, त्यांनी तपासणी दरम्यान बुकिंग पावती दाखवल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही. त्यामुळे अधिकृत पोर्टलवर जाऊन एचएसआरपीसाठी तात्काळ नोंदणी करण्याचे आवाहन आरटीओ प्रशासनाकडून केले आहे.
९,४६,३१४ वाहनांना नवी नंबरप्लेट
पुणे आरटीओ कार्यालयाअंतर्गत २०१९ पूर्वीच्या २६ लाख वाहनांपैकी ११ लाख ५७ हजार ६६१ वाहनचालकांनी एचएसआरपीसाठी नोंदणी केली. त्यातील ९ लाख ४६ हजार ३१४ वाहनचालकांनी नंबरप्लेट बसवून घेतली आहे. तर दोन लाख वाहनांना अजून बसविणे बाकी आहे.





