Kunbi Certificate : कुणबी प्रमाणपत्र कसं काढाल? कोणती कागदपत्र लागतील? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Kunbi Certificate for Maratha Community : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर केलेल्या उपोषणानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीस मान्यता दिली. या निर्णयामुळे आता मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळवणे शक्य होणार आहे. यासाठी सरकारने गाव आणि तालुका पातळीवर समित्या स्थापन केल्या असून, 21 ते 45 दिवसांत प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. चला, जाणून घेऊया ही प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांबाबत सविस्तर माहिती.
कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज प्रक्रिया
1. अर्ज सादर करा
– कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी अर्ज तालुकास्तरीय समितीकडे सादर करावा लागेल.
– उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्याकडे अर्ज दाखल करावा.
2. तपासणी प्रक्रिया
– तालुकास्तरीय समिती अर्ज स्वीकारल्यानंतर त्याची प्राथमिक तपासणी करेल आणि तो गाव पातळीवरील समितीकडे पाठवेल.
– गाव पातळीवरील समिती (ज्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश आहे) अर्जदाराची चौकशी करेल.
– ही चौकशी पोलिस पाटील आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत होईल.
3. कागदपत्रांची तपासणी
– गाव पातळीवरील समिती जुन्या नोंदी, ग्रामपंचायत दाखले, रहिवासी दाखला आणि वडिलोपार्जित कागदपत्रे तपासेल.
– चौकशी अहवाल तयार करून तो तालुकास्तरीय समितीकडे पाठवला जाईल.
4. अंतिम निर्णय
– तालुकास्तरीय समिती गाव समितीच्या अहवालाचे अवलोकन करेल आणि शिफारशीसह अर्ज सक्षम प्राधिकरणाकडे पाठवेल.
– विहित कार्यपद्धतीनुसार सक्षम प्राधिकरण 21 ते 45 दिवसांत कुणबी प्रमाणपत्र जारी करेल.
आवश्यक कागदपत्रे
अर्जदार मराठा समाजातील भुधारक, भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करणारा असावा. जमिनीच्या मालकीचा पुरावा (उदा. 7/12 उतारा) सादर करावा लागेल. जर जमिनीचा पुरावा नसेल, तर 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीचे पूर्वज स्थानिक क्षेत्रात राहत असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. कुळातील इतर व्यक्तींना मिळालेले कुणबी प्रमाणपत्र किंवा त्यासंबंधी प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल.




