नवी दिल्ली – विविध परिस्थितीजन्य कारणामुळे चांदीची मागणी वाढली आहे तर पुरवठा कमी आहे. अशा परिस्थितीत एक जानेवारीपासून चांदीच्या दरात 75% वाढ झाली असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत चांदीच्या भविष्यातील वाटचालीबाबत गुंतवणूकदारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र मागणी आणि पुरवठा यातील तफावत आणखी कायम राहणार आहे. पुढील वर्षाअखेरपर्यंत चांदीच्या दरात आणखी 20 टक्क्याची वाढ होऊ शकते असे काही विश्लेषकांनी सुचित केले आहे. थोडक्यात चांदीचे दर सध्या 50 डॉलर प्रति औंस आहेत ते पुढील वर्षापर्यंत 60 डॉलर प्रति औंस या पातळीपर्यंत जाऊ शकतात. दरम्यानच्या काळात पर्यायी गुंतवणुकीचे साधन म्हणून सोन्याच्या दारातही वाढ होत आहे आणि होत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एम्के वेल्थ मॅनेजमेंट या संस्थेने यासंदर्भात जारी केलेल्या टिपणात म्हटले आहे की, चांदीला दुहेरी मागणी आहे. एक तर महागाई आणि अस्थिरतेपासून बचाव करण्यासाठी चांदीची खरेदी होत आहे. तर दुसरीकडे विविध औद्योगिक क्षेत्रामध्ये चांदीची मागणी कमालीची वाढली आहे. त्यामुळे काही देश चांदीची साठेबाजी करीत असल्याचे बोलले जाते. सध्या मागणीपेक्षा पुरवठा 20 टक्क्यांनी कमी आहे आणि हीच परिस्थिती आगामी काळात कायम राहण्याची शक्यता असल्यामुळे चांदीचे दर वाढवू शकतात. इलेक्ट्रिक वाहन, सेमीकंडक्टर, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा या क्षेत्रातील महत्त्वाच्या उपकरणांमध्ये चांदीचा वापर केला जातो. जागतिक पातळीवर पर्यावरण संतुलनासाठी मोठ्या कंपन्या पर्यायी इंधन वापरण्यावर भर देत आहेत. यामुळे चांदीची मागणी वाढत आहे. त्यामुळेच एक जानेवारीपासून चांदीच्या दरामध्ये जवळजवळ 75% वाढ झाली आहे. शेअर बाजार निर्देशांकांनी मात्र इतका जास्त परतावा या कालावधीत दिलेला नाही. उलट वार्षिक पातळीवर शेअर बाजाराचे निर्देशांक जागतिक अस्थिरतेमुळे कमी पातळीवर आहेत.