Silver Prices: आगामी अर्थसंकल्पात चांदीची आयात कमी व्हावी यासाठी आयात शुल्क लावण्याची शक्यता बर्याच गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे वायदे बाजारात चांदीवरील प्रीमियम वाढला आहे. केवळ दागिन्यासाठीच नाहीतर गुंतवणूक आणि उद्योग क्षेत्रातूनही चांदीला प्रचंड मागणी वाढले आहे. अशा परिस्थितीत सरलेल्या वर्षात चांदीची आयात 129 टक्क्यांनी वाढून 7.77 अब्ज डॉलरवर गेली आहे. अर्थातच याचा परिणाम भारताच्या चालू खात्यावर होत आहे. त्यामुळे अनावश्यक आयात रोखण्यासाठी चांदीच्या आयातीवर शुल्क लावले जाऊ शकेल अशी शंका काही गुंतवणूकदार व्यक्त करीत आहेत. त्याचा चांदीच्या दरावर जास्तच परिणाम होत आहे. एमसीएक्सवर चांदीसाठीचे प्रीमियम अभूतपूर्व वाढले आहे. अशा परिस्थितीत धातू बाजारातील व्यापार्यांनी या अफवांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी चांदीवरील आयात शुल्क बारा टक्क्यावरून सहा टक्के इतके केले होते. चांदीची वाढलेली तस्करी कमी करण्यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. सध्या चांदीवर सहा टक्के आयात शुल्क आणि तीन टक्के जीएसटी आहे. आता चांदीवर किती आयात शुल्क लावले जाईल याबाबत व्यापार्यात चर्चा चालू आहे. मात्र याबाबत मतैक्य होत नाही. अशा परिस्थितीत एक फेब्रुवारीपर्यंत चांदीचे दर कमालीचे अस्थिर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काही व्यापार्यांना वाटते की, चांदीच्या आयात शुल्कात तीन ते चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र काही व्यापार्यांनी सांगितले की, एमसीएक्सवर चांदीवरील प्रीमियम 13% च्या जवळपास आहे. याचा अर्थ चांदीच्या आयात शुल्कात 15% पर्यंत वाढ होऊ शकते. दरम्यान आयात शुल्काच्या वाढीच्या शक्यतेचा वापर करून चांदीच्या दरात अस्थिरता निर्माण करण्यात येत आहे असा आरोप ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फाऊंडेशनने केला असून अर्थ मंत्रालयाने यात तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथा यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. हेही वाचा – Stock Market: अदानी समूहाचे संकट आणि जागतिक घडामोडींचा बाजाराला फटका; 16 लाख कोटींचे नुकसान